तेजस मोहतुरे, प्रतिनिधी
शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये एक अनोखं नातं असतं. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात आपल्यावर सर्वाधिक प्रभाव टाकणारी व्यक्ती ही आपली शिक्षक असते. या व्यक्तीचा प्रभाव शेवटपर्यंत आपल्या वागणुकीत नकळतपणे दिसून येत असतो. गोंदियात (Gondiya News) अशाच शिक्षकासाठी गाव एकवटल्याचं पाहायला मिळालं.
गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील 626 शिक्षकांच्या बदल्या (ZP School) करण्यात आला. यावेळी देवरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांच्या सुद्धा समावेश आहे. आपल्या शाळेतील शिक्षकांची बदली झाल्याचे विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना कळताच आम्हाला जुनेच शिक्षक हवेत यासाठी ते आग्रह करू लागले. यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या समोर विद्यार्थ्यांनी एल्गार पुकारत शाळेबाहेरच ठिय्या आंदोलन केलं. 'आम्हाला आमचे जुने शिक्षक हवे दुसरे नकोट, असा विद्यार्थ्यांनी आग्रह धरला.
विद्यार्थ्यांची आक्रमक भूमिका आणि त्यांनी पुकारलेला एल्गार पाहत जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी थेट आंदोलनस्थळी पोहोचले. विद्यार्थ्यांच्या समस्या, त्यांच्या मागण्या ऐकल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. शैक्षणिक सत्र 2024 सुरू होऊन आठवडा लोटला आहे. त्यात अचानक शिक्षकांच्या झालेल्या बदल्यामुळे अनेक शाळेत नवी शिक्षक रुजू झालेत. असाच प्रकार गोंदिया जिल्ह्यातील देवरी येथे घडला.
विद्यार्थ्यांना जे शिक्षक शिकवत होते, त्यातील तीन शिक्षकांची बदली झाली. परंतू विद्यार्थ्यांनी आमचे शिक्षक आम्हाला परत करा ही मागणी रेटून धरली. विद्यार्थ्यांनी शासन व प्रशासनाकडे लावून धरलेली मागणी अखेर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पूर्ण केली. आम्हाला आमचे शिक्षक हवेत, त्यांची बदली रद्द करावी ही विद्यार्थ्यांची भूमिका होती. ते शिकवताना आम्हाला व्यवस्थित समजून सांगतात, तेच आम्हाला उमजते असं विद्यार्थ्यांचं म्हणणं होते.
नक्की वाचा - मुसळधार पावसाचा पोलीस भरतीला फटका; अकोला, पुण्यातील मैदान चाचणी पुढे ढकलली
यावेळी संतप्त विद्यार्थ्यांनी शाळेबाहेर बसून आंदोलन केलं. शिक्षकांची बदली करणारे मुख्य कार्यकारी अधिकारी जोपर्यंत येऊन आम्हाला आश्वासन देत नाहीत तोपर्यंत शाळेबाहेर आमचं आंदोलन सुरू राहील, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी व पालकांनी घेतली. सकाळपासून आंदोलनाला बसलेले विद्यार्थी त्यांच्यासोबत त्यांच्या पालकाची असलेली साथ हे सर्व काही बघून मुख्य कार्यकारी अधिकारी थेट गोंदियावरून देवरीत आले. यावेळी विद्यार्थ्यांचं आंदोलन शाळेबाहेर सुरूच होतं. आम्हाला आमचे जुने शिक्षक हवेत, जर आमचे जुने शिक्षक आम्हाला मिळत नसतील तर आम्ही शाळा सोडू अशी भूमिका विद्यार्थ्यांसोबत पालकांनी घेतली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विद्यार्थी व पालकांशी चर्चा करत विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असल्याचे सांगत नवीन शिक्षक देणार तसेच जुने शिक्षकांची बदली स्थगिती करण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदी झाले. जर पुन्हा शिक्षकांची बदली झाली तर आम्ही आंदोलन करू असे सुद्धा विद्यार्थ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सांगितले.