- भाजपचे आमदार राम कदम यांनी पाणीप्रश्न सुटेपर्यंत केस न कापण्याचा संकल्प चार वर्षांपूर्वी घेतला होता
- राम कदम यांनी आपल्या पाणीप्रश्नासाठी सतत संघर्ष केला
- त्यांनी गुरुवारी आनंदगड पाणी टाकी येथे केस कापून कॅन्सरग्रस्थ रुग्णांना केसांचे दान केले
भाजपचे घाटकोपर पश्चिमेचे आमदार राम कदम हे नेहमीच चर्चेत असतात. कधी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तर कधी ते आयोजित करत असलेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी. गेल्या काही वर्षात राम कदम यांची वेशभूषा बदलली होती. ती सर्वांनीच पाहीली. त्यांनी आपले केस वाढवले होते. लांब केसात ते वावरताना दिसत होते. त्यांनी केस का वाढवले हे अनेकांना माहितच नव्हते. काही जण ते कट्टर हिंदूत्ववादी झाले आहेत म्हणून त्यांनी केस वाढवले असे बोलत होते. पण त्या मागचं कारण मात्र वेगळंच होतं. त्यांनी एक पण केला होता. त्यामुळे त्यांनी केस वाढवले होते. अखेर चार वर्षानंतर हा पण पूर्ण झाला. त्यानंतर त्यांनी सर्वांसमोर जेसीबीच्या साक्षिनेच आपले केस कापले.
जोपर्यंत आपल्या घाटकोपर विक्रोळीचा पाणीप्रश्न सुटत नाही, तोपर्यंत डोक्यावरील केस कापणार नाही असा पण आमदार राम कदम यांनी केला होता. हा संकल्प त्यांनी चार वर्षा पूर्वी केला होता. चार वर्ष त्यांनी संयम ठेवला असं ते सांगतात. हा पाणी प्रश्न सुटावा यासाठी आपण सतत संघर्ष केला. तसेच त्याचा पाठपुरावा ही सातत्याने करत होतो असं ही त्यांनी सांगितलं. अखेर त्या प्रयत्नांना यश मिळालं आहे असं ते म्हणाले. त्यामुळे गुरुवार दिनांक 18 डिसेंबर रोजी सकाळी 11:00 वाजता, आनंदगड पाणी टाकी येथे केस कापून ते कॅन्सरग्रस्थ रुग्णांना दान केले असं कदम यांनी सांगितलं.
भाजपचे आमदार राम कदम यांनी केस न कापण्याची शपथ चार वर्षापूर्वी घेतली होती. त्यावेळी ते म्हणाले होते की घाटकोपर पश्चिम हा माझा मतदार संघ आहे. हा मतदारसंघ डोंगरांचा आहे. इथली लोकसंख्या वाढत चालली आहे. सिंगल घरांची डबल घरं झाली आहेत. इथल्या अनेक घरात आजही पाणी येत नाही. मुंबई महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे इथं पाणी येत नाही असा त्यांचा त्यावेळी आरोप होता. इथली लोक आपल्याला निवडून देता. असं असताना आपण त्यांना मुबलक पाणी देवू शकत नाही. असं असेल तर आपला निवडून येण्याचा फायदा काय असं ते म्हणाले होते.
त्याच वेळी त्यांनी पण केला होता. की आपल्या मतदार संघातील डोंगराळ भागात राहणाऱ्या रहिवाशांना जोपर्यंत मुबलक पाणी मिळणार नाही तोपर्यंत डोक्यावरचे केस कापणार नाही असं त्यांनी जाहीर केलं होतं. या काळात महायुतीचे सरकार राज्यात होते. त्यांचा पाठपूरावा कदम यांनी केला. या काळात त्यांचे केस वाढलेले लोकांना पाहीले. त्याचीही चर्चा होत होती. त्यांनी नवी हेअर स्टाईल केली आहे की काय असा ही प्रश्न या निमित्ताने केला जात होता. पण त्यांनी तो पण केला होता. अखेर त्यांनी दिलेला शब्द पूर्ण केला आहे असा त्यांचा दावा आहे. त्यामुळे आपण केस कापत असल्याचं ही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.