- छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने नोव्हेंबर २०२५ मध्ये ४८.८८ लाख प्रवाशांची वाहतूक नोंदवली आहे
- २९ नोव्हेंबर रोजी विमानतळावर एकाच दिवशी १.७६ लाख प्रवाशांनी प्रवास केला. हा विक्रम आहे.
- नोव्हेंबर महिन्यात विमानतळावर २७,९६० उड्डाण-लँडिंग हालचाली नोंदल्या गेल्या.
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने (CSMIA) नोव्हेंबर 2025 मध्ये प्रवासी वाहतुकीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. सणासुदीचा काळ आणि हिवाळी पर्यटनामुळे विमानतळावर प्रवाशांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली. संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात तब्बल 48.88 लाख प्रवाशांनी या विमानतळावरून प्रवास केला आहे. 29 नोव्हेंबर रोजी एकाच दिवसात 1.76 लाख प्रवाशांच्या वाहतुकीचा ऐतिहासिक विक्रम नोंदवला गेला आहे.
विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात हवाई वाहतुकीच्या हालचालींमध्येही (ATM) मोठी वाढ झाली आहे. एकूण 27,960 हालचालींची नोंद झाली. यामध्ये 3.4 दशलक्ष देशांतर्गत, तर 1.4 दशलक्ष आंतरराष्ट्रीय प्रवाशांचा समावेश आहे. विशेष म्हणजे 21 नोव्हेंबर रोजी 1036 विमानांच्या उड्डाण-लँडिंगची नोंद झाली आहे. जी विमानतळाची ऑपरेशनल सज्जता अधोरेखित करते.
आंतरराष्ट्रीय स्तरावर दुबई हे 2,09,714 प्रवाशांसह मुंबईकरांचे सर्वात पसंतीचे ठिकाण ठरले आहे. तर लंडन आणि अबु धाबीने त्यानंतरचे स्थान पटकावले. देशांतर्गत प्रवासात दिल्लीला 6,09,646 प्रवाशांची सर्वाधिक पसंती मिळाली आहे. त्यापाठोपाठ बेंगळुरू आणि चेन्नईचा क्रमांक लागतो. मुंबई विमानतळाने दाखवलेली ही शाश्वत वाढ जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रात शहराचे स्थान अधिक बळकट करणारी ठरली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world