Zombie Drugs : झॉम्बी ड्रग्जचं धक्कादायक सत्य उघड; तरुणाने नेमकं काय खाल्लं? ठाणे पोलिसांचा मोठा खुलासा

मीरा-भाईंदरमधील एका व्हायरल व्हिडिओमधील तरुणाची अवस्था झॉम्बी ड्रगमुळे झाल्याचे बोलले जात होते. मात्र पोलिसांनी यामागे वेगळंच कारण असल्याचं सांगितलं.

जाहिरात
Read Time: 2 mins

Mumbai News : मुंबईतील नेस्कोतील कॉन्सर्टमध्ये दोन तरुणांचा ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे मृत्यू झाला होता. त्याच सुमारास मीरा रोड-भाईंदर परिसरातील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. भान हरपून एकाच ठिकाणी एकाच अवस्थेत उभ्या असलेल्या या तरुणाच्या या व्हिडीओमुळे झॉम्बी ड्रग्ज खरंच मुंबईच्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचलं आहे का? असा प्रश्न निर्माण झाला होता. या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना NDTV मराठीला काही धक्कादायक बाबी समजल्या.  

एकाच जागी खिळून राहिलेल्या या माणसाचा व्हिडीओ बराच व्हायरल झाला होता. मीरा भाईंदरमधला हा व्हिडियो हादरवणारा होता. कारण या माणसाची ही अवस्था झॉम्बी ड्रगमुळे झाल्याचे बोलले जात होते. मात्र पोलिसांनी यामागे वेगळंच कारण असल्याचं सांगितलं. या तरुणाची अशी अवस्था झॉम्बी ड्रगमुळे नाही तर एका विशिष्ट औषधामुळे झाल्याचं पोलिसांना कळालं आहे. या औषधात एक विशिष्ट घटक असतो, ज्याला प्रीगाबालिन म्हणतात. प्रीगाबालिन असलेली औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय दिली जात नाहीत. 

Advertisement

नक्की वाचा - Yavatmal News : यवतमाळमध्ये 'अम्मा'सारखी दहशत? तब्बल 34 आदिवासी मुली गायब; 6 महिन्यातील भीषण वास्तव

आता इथून खरी धक्कादायक बाबी उजेडात येण्यास सुरूवात झाली. आमच्या प्रतिनिधींनी वांद्रे पूर्वेतील 4 दुकानांमध्ये जात प्रेगाबालिनसारखेच असलेले प्रेगाबीड हे औषध मागितले. याही औषधासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन गरजेचे असते. मात्र अनेक ठिकाणी मेडिकलमधून सर्रास याची विक्री होते. 

भाईंदरमधील तरुणासोबत नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाईंदरला आल्यानंतर तरुणाने नवघरच्या एका मेडिकल स्टोअरमधून कोणत्याही प्रिस्क्रिप्शनशिवाय एक ओषधांची स्ट्रिप खरेदी केली. त्याने १३ एप्रिल रोजी एकदाच प्रेगाबालिनच्या पाच गोळ्या खाल्ल्या. यानंतर भाईदर भागात चालत असताना त्याना चक्कर येऊ लागली. यानंतर त्याला हालचालही करता येत नव्हती. त्यामुळे तो एकाच जागी उभा होता. 

हे औषध कशासाठी वापरतात? 

काय आहे 'प्रीगाबालिन'?  

हे औषध प्रामुख्याने फिट येत असलेल्यांवर उपचारांसाठी, नसांच्या वेदना कमी करण्यासाठी आणि चिंता कमी करण्यासाठी वापरलं जातं.  

'प्रीगाबालिन'च्या अतिसेवनाने काय होतं

  • तीव्र गुंगी येते
  • एकाग्रता नष्ट होते
  • शरीरावरील नियंत्रण राहत नाही
  • हृदयविकाराचा झटका येऊ शकतो
  • अतिसेवनामुळे मृत्यूही होऊ शकतो 

अंमली पदार्थ हे लपून छपून विकले जातात, ज्यामुळे ते महाग असतात. मात्र काही औषधे ही अतिप्रमाणात घेतल्यास अमली पदार्थांसारखीच नशा देणारी असतात. ही औषधे कोणतेही प्रिस्क्रिप्शनशिवाय सर्रासपणे मिळणं ही चिंतेची बाब आहे.