तुकोबारायांच्या पालखीने पार केला सर्वात कठीण रोटी घाट, गावच्या बैलजोड्याने दिली साथ!

उत्साही वातावरणात संपूर्ण दिंडी सोहळ्याने ज्ञानोबा तुकारामाच्या व पांडुरंगाच्या नामस्मरणात रोटी घाट पार केला.

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

जगतगुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने दौंड तालुक्यातील वरवंडकरांचा पाहुणचार घेऊन आज बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडीकडे मुक्कामासाठी प्रस्थान केला आहे. दिंडी सोहळ्याने पुणे सोलापूर महामार्गावरील प्रवास संपवून नागमोडी वळणावळणाचा रोटी घाट टाळ मृदुंगाच्या साथीने हरिनामाच्या जयघोषात सहज पार केला. हा घाट पार करण्यासाठी रोटी गावच्या पाच बैल जोड्यांनी परंपरेप्रमाणे पालखीरथाला साथ दिली आहे. निसर्गानेही वारकऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी उन-सावल्यांचा खेळ सुरू केला होता.

या उत्साही वातावरणात संपूर्ण दिंडी सोहळ्याने ज्ञानोबा तुकारामाच्या व पांडुरंगाच्या नामस्मरणात रोटी घाट पार केला. त्यानंतर माथ्यावर आरती करण्यात येऊन भोजन व विश्रांतीनंतर पालखी सोहळा पुढे रवाना झाला. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे देहूतून प्रस्थान झाल्यानंतर पंढरीपर्यंत जाण्यासाठी जवळपास 230 किलोमीटरचा अंतर पार करावं लागतं. यापैकी सर्वात खडतर मार्ग म्हणजे रोटी घाट. हाच रोटी घाट लाखो वारकऱ्यांनी हरिनामाच्या जयघोषात पांडुरंगाच्या भक्तीत टाळ मृदंगाच्या गजरात अगदी सहज पार केला.

नक्की वाचा - पर्यटकांचा हिरमोड! आणखी एका पर्यटनस्थळावर 15 सप्टेंबरपर्यंत जाण्यास बंदी

दरम्यान जगतगुरू श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा वरवंड येथील मुक्कामी होता. यानंतर रोटी घाट मार्गे बारामती तालुक्यातील गवळ्याची उंडवडी या ठिकाणी मुक्कामाकरिता मार्गस्थ झाला आहे. पालखी सोहळ्याला अडथळा येऊ नये म्हणून पुणे ग्रामीण पोलिसांनी पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंभ गावापूर्वीची अवजड वाहनांची वाहतूक थांबवलेली आहे.