यशपाल सोनकांबळे, प्रतिनिधी
Pune Vehicle Registration Report : पुण्यात दुचाकी आणि इलेक्ट्रिक वाहन खरेदीच्या नोंदीत घसरण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. गुढी पाडव्याच्या पार्श्वभूमीवर वाहन खरेदीला चांगली चालना मिळते, मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदा वाहन नोंदणीत घट झाल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. १८ मार्च २०२५ ते २८ मार्च २०२५ या कालावधीत एकूण १३,१९० वाहनांची नोंदणी झाली होती. तर ७ मार्च २०२६ ते १९ मार्च २०२६ या कालावधीत ही संख्या ११,९३७ इतकी राहिली आहे.
गतवर्षी ८,२६० मोटारसायकलींची नोंद झाली, पण...
दुचाकी वाहनांमध्ये सर्वाधिक नोंदणी झाली असून मागील वर्षी ८,२६० मोटारसायकलींची नोंद झाली होती, यंदा ती घटून ७,९८६ इतकी झाली आहे. चारचाकी वाहनांमध्येही घट दिसून आली असून मोटार कारची नोंदणी ३,३३२ वरून २,६६० पर्यंत कमी झाली आहे. बस,ऑटो रिक्षा,मालवाहू वाहने आणि ट्रॅक्टर यामध्येही घट नोंदवण्यात आली आहे.मात्र ‘टुरिस्ट टॅक्सी' आणि ‘इतर' या प्रकारांमध्ये किंचित वाढ दिसून आली आहे.
नक्की वाचा >> CCTV Video : छत्रपती संभाजी नगरमध्ये नागरिकांची झोप उडाली, रात्रीच्या त्या व्हिडीओमुळे लोक भयभीत, काय घडलं?
इलेक्ट्रिक दुचाकी आणि कारच्या नोंदणीत घट
दरम्यान,इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीतही घट झाल्याचे चित्र आहे. २०२५ मध्ये २,१२४ इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाली होती, तर २०२६ मध्ये ही संख्या १,५३० पर्यंत खाली आली आहे. विशेषतः इलेक्ट्रिक दुचाकी आणि कारच्या नोंदणीत घट दिसून आली आहे.एकूणच, गुढी पाडवा सणाच्या काळात अपेक्षित असलेली वाहन खरेदीची उत्सुकता यंदा कमी झाल्याचे चित्र असून, बाजारातील मंदी किंवा आर्थिक परिस्थितीचा यावर परिणाम झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.