Uddhav-Raj Thackeray Meet : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे 'एक है तो सेफ है'ची भूमिका घेणार का?

Uddhav and Raj Thackeray meet : या कौटुंबिक भेटीनंतर पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार का याची चर्चा रंगली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

विधानसभेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना बसलेल्या फटक्यानंतर ते दोघेही एकत्र यावं अशी मागणी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून केली जात होती. आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली आहे. निमित्त आहे राज आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीचं. आज 22 डिसेंबरला राज ठाकरे यांच्या सख्या बहिणीच्या मुलाचं लग्न दादर  इथं पार पडलं. या लग्न सोहळ्याला उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे यावेळी राज ठाकरे, उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरे यांच्यामध्ये संवाद पाहायला मिळाला. या कौटुंबिक भेटीनंतर पुन्हा एकदा ठाकरे बंधू एकत्र येणार का याची चर्चा रंगली आहे.

Advertisement

नक्की वाचा - Raj-Uddhav Thackeray : राज आणि उद्धव ठाकरे एकत्र; कौटुंबिक कार्यक्रमात ठाकरे बंधुंची भेट

यंदाच्या विधानसभा निडणुकीत ठाकरे बंधूंना जोरदार झटका बसलाय. त्यामुळे आता दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे. दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं, अशी भाषा दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून सुरू झाली आहे.   उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 2009 साली 44, 2014 मध्ये 63 आणि 2019 मध्ये 56 आणि यंदा 20 आमदार निवडून आले आहेत. तर राज ठाकरेंच्या मनसेचे 2009 साली 13 आमदार, 2014 आणि 2019 मध्ये एक आमदार तर यंदा एकही आमदार निवडून आलेला नाही.

Advertisement

ही आकडेवारी आणखी घसरू नये, अशी ठाकरे गट आणि मनसेतल्या अनेकांची इच्छा आहे. दोन्ही भाऊ पुन्हा सोबत यावेत अशी कार्यकर्त्यांचीही इच्छा आहेच. मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणं, एवढं सोपं नाही. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर 18 वर्षांत बरंच काही घडल आहे. दोघांनी एकमेकांविरोधात टोकाची टीका केली आहे. कुटुंबावरही आरोप-प्रत्यारोप झालेत. मात्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना राज ठाकरे उपस्थित होते. अमित ठाकरेंच्या लग्नाला उद्धव ठाकरेंची सहकुटुंब उपस्थिती होती. 

Advertisement

उद्धव ठाकरेंच्या अँजिओप्लास्टीनंतर आणि राज ठाकरेंची मुलगी उर्वशीच्या अपघातानंतरही दोन भाऊ एकमेकांच्या बाजूनं होते. मात्र राजकीय स्तरावर ठाकरे बंधूंची तोंड नेहमीच विरुद्ध दिशेने पाहायला मिळाली. 2019 मध्ये आदित्य ठाकरेंच्या पहिल्या निवडणुकीत मनसेनं उमेदवार दिला नव्हता. मात्र यंदा अमित ठाकरेंच्या पहिल्या निवडणुकीत ठाकरेंनी उमेदवार दिला आणि त्याच महेश सावंतांकडून अमित ठाकरे यांचा पराभव झाला. याच राजकीय डावपेचांमुळे ठाकरेंबंधूंमधला दुरावा आणखीच वाढला.

नक्की वाचा - Cabinet Portfolio: CM फडणवीसांची ताकद, साताऱ्याचा दबदबा अन् दिग्गजांची कोंडी, खाते वाटपातील 10 वैशिष्ट्ये

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे राजकीयदृष्ट्या कितपत एकत्र येऊ शकतील, याबद्दल अंदाज बांधणं कठीण आहे. 2014 आणि 2017 मध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना युतीचा प्रस्ताव दिला होता. मात्र तेव्हा टाळी काही वाजली नाही. आता राजकीय परिस्थिती बदलली आहे. महापालिका निवडणुका तोंडावर आहेत. उद्धव ठाकरेंसमोर अस्तित्वाचा प्रश्न आहे, तर मनसेचं इंजिन चिन्हही धोक्यात आलं आहे. राज ठाकरेंच्या राजकीय भूमिका सातत्यानं बदलत राहिल्यायत. त्यातच राज ठाकरेंच्या धोरणांमध्ये सातत्याचा अभाव आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे राज यांना सोबत घ्यायला कितपत उत्सुक आहेत, याची शाश्वती नाही. तसंच उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तरी पुन्हा नंबर एक आणि प्रमुख कोण, हा वीस वर्षांपूर्वी महाबळेश्वरच्या अधिवेशनाआधी पडलेला प्रश्न आणि त्यानंतरचं नाट्य याची पुनरावृत्ती होणार नाही, याची गॅरेंटी कोणीच देऊ शकणार नाही.