उद्धव ठाकरे पुन्हा CM होईपर्यंत मन:शांती मिळणार नाही, शंकराचार्यांचं मोठं वक्तव्य

बद्रीनाथ ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सोमवारी शिवसेना (UBT) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

बद्रीनाथ ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सोमवारी शिवसेना (UBT) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शंकराचार्यांनी ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर जाऊन पूजा केली. त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना आशीर्वाद दिले. 

स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी यावेळी मीडियाशी बोलताना सांगितलं की, 'आम्ही हिंदू धर्माचं पालन करतो. आमचा पाप-पुण्यावर विश्वास आहे. विश्वासघात हा सर्वात मोठ्या पापापैकी एक आहे. उद्धव ठाकरेंसोबत विश्वासघात झाला. त्यांनी मला बोलावलं. माझं स्वागत केलं. त्यांच्याबरोबर झालेल्या विश्वासघातावर आम्हाला दु:ख आहे. ते पुन्हा मुख्यमंत्री होईपर्यंत आम्हाला मनशांती मिळणार नाही, असं शंकराचार्यांनी सांगितलं. 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

ज्योतिर्मठाच्या शंकराचार्यांनी पुढं सांगितलं की, 'विश्वासघात करणारा हिंदू असू शकत नाही. विश्वासघात सहन करणारा हिंदू आहे. महाराष्ट्रातील सर्व नागरिकांमध्ये विश्वासघातामुळे रोष आहे. नुकतंच (लोकसभा निवडणूक) त्याचं प्रतिबिंब उमटलंय. आमचं राजकारणाशी काहीही देणंघेणं नाही. पण, आम्ही धर्मानुसार पाप असलेल्या विश्वासघाताबद्दल बोलत आहोत,' असं त्यांनी स्पष्ट केलं. 

मोदींचा हितचिंतक

अनंत अंबानी यांच्या लग्नात शंकराचार्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली. या भेटीवर त्यांनी प्रतिक्रिया दिलीय. 'होय, ते माझ्याजवळ आले होते. त्यांनी मला नमस्कार केला. आमच्याकडं जो येतो त्याला आम्ही आशीर्वाद देतो, हा आमचा नियम आहे. ते (नरेंद्र मोदी) आमचे शत्रू नाहीत. मी नेहमी त्यांच्या भल्याचं सांगतो. त्यांच्याकडून काही चूक झाली तर ते देखील त्यांना सांगतो.' असं शंकराचार्य यावेळी म्हणाले. 

Advertisement

( नक्की वाचा : दिल्लीतील केदारनाथ मंदिर हिंदू परंपरेचा अपमान? का होतोय विरोध? )

केदारनाथ मंदिरातून 228 किलो सोनं गायब

दिल्लीतील बुराडीमध्ये उभारण्यात येणाऱ्या केदरानाथ मंदिराचा वाद सध्या पेटलाय. या मंदिराला उत्तराखंडमधील पांडा वर्ग तसंच नागरिकांकडूनही विरोध होतोय. त्यातच ज्योतिष पीठ के शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी केदारनाथ मंदिराबाबत गंभीर आरोप केला आहे. केदारनाथ मंदिरातून 228 किलो सोनं गायब करण्यात आलं आहे. त्याबाबत कुणालाही काळजी नाही. त्याची चौकशी का केली जात नाही? असा सवाल अविमुक्तेश्वरानंदांनी केलाय. 

दिल्लीमध्ये केदारनाथ मंदिर कसं होऊ शकतं? बारा ज्योतिर्लिंगांचं स्थान नक्की आहे. तुम्ही लोकांमध्ये गोंधळ का निर्माण करत आहात? देवाचे हजार नाव आहेत. कोणत्याही नावाची स्थापना करुन त्याची पूजा करा. पण, केदारनाथ धाम दिल्लीमध्ये होऊ देणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. 
 

Advertisement