उनकेश्वर मंदिराचा वाल्मिकी रामायणातही उल्लेख, आजही 'त्या' कुंडातून वाहतो गरम पाण्याचा झरा

वाल्मिकी रामायणातील तेराव्या अध्यायानुसार शरभांग ऋषी उनकेश्वर येथे तपस्येला बसले होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

तीर्थक्षेत्र माहूरपासून चाळीस किमी अंतरावर आणि नांदेड जिल्ह्याच्या किनवट तालुक्यात उनकेश्वर नावाचं एक मंदिर आहे. येथील कुंडात नैसर्गिकरित्या गरम पाण्याचा झरा आहे. या पाण्यात आंघोळ केल्याने त्वचारोग दूर होतात अशी मान्यता आहे. या कुंडातील पाण्यात सल्फरचं प्रमाण अधिक असल्याने अशा पाण्यात आंघोळ केल्याने त्वचेला फायदा होतो असं म्हटलं जातं. या मंदिराचं वैशिष्ट्यं म्हणजे अख्ख्या गावात अन्य कुठेही जमिनीतून गरम पाणी निघत नाही. सर्वत्र थंड पाणी आहे. फक्त या एकाच ठिकाणी गरम पाणी जमिनीतून येते, त्यामुळे याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातं. 

उनकेश्वर हे गाव असाध्य अशा त्वचा रोगांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ओळखलं जातं. काही लोक याला देवाची कृपा म्हणतात, तर काही याला वैज्ञानिक चमत्कार म्हणतात. उनकेश्वर येथील हेमाडपंथी शिवमंदिरात श्रावण महिन्यात विशेतः प्रत्येक सोमवारी 'हर हर महादेव'चा जयघोष करत राज्यासह परप्रांतातून भाविक दर्शनासाठी हजेरी लावतात. श्रावण महिन्यात पूजाअर्चा व अभ्यंगस्नान करण्यासाठी उनकेश्वर येथे हजारोंच्या संख्येने भाविक येथे  हजेरी लावत असल्यामुळे या मंदिराला दर सोमवारी यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. 

माहूर गडापासून 40 किलोमीटरवर असलेल्या उनकेश्वर येथे गरम पाण्याचा झरा, हेमाडपंथी शिवमंदिर, बहुगुणी वनौषधींची उपलब्धता, ज्ञानधारणा, निसर्गोपचार केंद्र असल्याने राज्यासह तेलंगाना,आंध्रप्रदेश, कर्नाटकातुन भाविक येथे येतात. मराठी पंचांगानुसार श्रावण महिन्यास दिनांक 17 पासून सुरूवात झाली. श्रावण महिना सुरू झाला की, उनकेश्वर मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांची सुरूवात होते. येथील महादेव मंदिरातील गाभाऱ्यात पुरातन पिंड आहे. भाविक हातात बेल-फुल, ओम नमः शिवाय जप करीत महादेवाचे दर्शन घेतात.

नक्की वाचा - सावजी पेढ्यांची तीन पिढ्यांची परंपरा, परदेशातही पसरलाय पेढ्याचा गोडवा

वाल्मिकी रामायणात उनकेश्वरचा उल्लेख
वाल्मिकी रामायणातील तेराव्या अध्यायानुसार शरभांग ऋषी उनकेश्वर येथे तपस्येला बसले होते. शारभांग ऋषी त्वचा रोगाने ग्रस्त होते. त्यांच्या तपस्येला प्रसन्न होऊन भगवान श्रीराम सीतेसह व लक्ष्मणसह उनकेश्वरला आले. त्यांनी शारभांग ऋषीची सेवा करण्यासाठी अग्निबाण मारला. अग्निबाणाने गरम पाण्याचा झरा तयार झाला. त्या पाण्याने शारभांग ऋषींना त्वचा रोगातून मुक्तता मिळाली. रामायण काळापासून आजवर येथे गरम पाण्याचा झरा कायम असून अनेक त्वचा रोगी येथील पाण्याने त्वचा रोग बरा झाल्याचं सांगतात.

Advertisement