पालघरमधील वाढवण येथे देशातील सर्वात मोठे बंदर बांधले जाणार आहे. ज्यामुळे या परिसराचा कायापालट होणार आहे. याच पार्श्वभूमीवर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने वाढवण बंदराला वाहतूक सेवा अधिक वेगवान करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. वरोर, वाढवण ते तवा या 32.180 किमी लांबीच्या द्रुतगती महामार्गाच्या बांधकामासाठी NHAI ने निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. हा महामार्ग तयार झाल्यानंतर वरोर, वाढवण ते तवा हा सध्याचा दीड तासाचा प्रवास अवघ्या 30 मिनिटांत पूर्ण होणार आहे.
या प्रकल्पासाठी 2,575 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. निविदा प्रक्रिया लवकर पूर्ण करून नव्या वर्षात महामार्गाचे काम सुरू करण्याचे NHAI चे नियोजन आहे. एकदा काम सुरू झाल्यानंतर, ते अडीच वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर, वाहतुकीची मोठी समस्या दूर होण्यास मदत होईल.
(नक्की वाचा- Sindhudurg News : सिंधुदुर्गातील करुळ घाट दरड कोसळल्याने बंद, वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली)
24 गावांमधून जमीन संपादन, 50% काम पूर्ण
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी 24 गावांमधून एकूण 600 हेक्टर जागा संपादित करावी लागणार आहे. यापैकी, 22 गावांची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे आणि 50% भूसंपादन पूर्ण झाले आहे. एका वरिष्ठ NHAI अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आणि कंत्राट अंतिम झाल्यावर, 90% भूसंपादन पूर्ण करून महामार्गाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्यात येईल.
सध्या वाढवण बंदरापर्यंत पोहोचण्यासाठी थेट रस्ता नाही. त्यामुळे, प्रवाशांना तवा येथून पालघर आणि नंतर वरोर मार्गे प्रवास करावा लागतो, ज्यासाठी किमान दीड तास लागतो. राज्यातील जास्तीत जास्त जिल्ह्यांमधून वाहनांना वाढवण बंदरापर्यंत सहज पोहोचता यावे, यासाठी NHAI ने एक मोठी योजना आखली आहे. वरोर, वाढवण ते तवा हा महामार्ग पुढे तवा ते भरवीर महामार्गाने समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. यामुळे अनेक जिल्ह्यांमधून येणाऱ्या वाहनांना थेट वाढवण बंदरापर्यंत जलद आणि सोप्या पद्धतीने पोहोचता येईल, ज्यामुळे राज्याच्या आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळेल.