Vaishnavi Hagavane Case : वैष्णवी हगवणेच्या मृत्यूप्रकरणाचे राजकीय पडसाद उमटू लागले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांना फोन केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात इतर कारवाई होत असताना तिचे 9 महिन्यांचे अपत्य कुठे आहे, याचा तातडीने शोध घ्या आणि ते तिच्या आईच्या कुटुंबीयांना सुपूर्द करा, अशी विशेष सूचना मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना केल्याची माहिती आहे. या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची माहिती आहे.
(नक्की वाचा- Pune News : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण; अजित पवारांचा लग्नातील फोटो व्हायरल)
अजित पवारांचाही पोलीस आयुक्तांना फोन
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांना फोन करुन आरोपींना तत्काळ अटक करुन कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती सूरज चव्हाण यांनी सांगितलं. तर या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नसून पत्रकार परिषद घेऊन याबाबत सविस्तर बोलणार असल्याचं देखील अजित पवारांनी म्हटलं.
महिला आयोगाकडून सुमोटो दाखल
राज्य महिला आयोगाने वैष्णवी हगवणे प्रकरणात सुमोटो दाखल केला आहे. आतापर्यंत माझ्याकडे या प्रकरणात कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याचं महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे. या प्रकरणाच्या API सोबत मी संपर्कात आहे. गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 5 आरोपींपैकी 2 फरार आहेत. सासू, नणंद, नवरा अटकेत आहे. तर सासरा आणि दीर फरार असून त्यांचा तपास सुरू आहे.
(नक्की वाचा- हगवणे पिता-पुत्राची पक्षातून हकालपट्टी, अजित पवारांच्या पोलीस आयुक्तांना कडक कारवाईच्या सूचना)
गुन्हेगार कोणत्या जाती, पक्ष, धर्माचा आहे हे मी पाहत नाही. राजेंद्र हगवणे आमच्या पक्षाचे पदाधिकारी नव्हते. त्यांचा मुलगा आमच्या संघटनेत काम करत होता. गुन्हेगार व्यक्तीला आम्ही पाठीशी घालत नाही. न्याय मिळेपर्यंत आम्ही पाठपुरावा करत राहू. दादांची भूमिका स्पष्ट आहे. कोणत्याही गुन्हेगाराला आम्ही पाठीशी घालणार नाही. आरोपीला पाठीशी घालायचे असते तर मी सुमोटो दाखल केला नसता. आरोपीला शिक्षा होईल, याचा मी स्वत: पाठपुरावा करत आहे, असंही रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.