Vasai News: लोखंडी दांड्यावर आपटलं, हवेत भिरकावलं, फरफटत नेलं; वडिलांसोबतच्या वादातून चिमुकल्यावर क्रूर हल्ला

Vasai News: वसई पश्चिमेकडील एका सोसायटीत चार वर्षांच्या निष्पाप चिमुरड्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडिलांशी झालेल्या किरकोळ वादाचा राग नराधम आरोपीने मुलावर काढला

जाहिरात
Read Time: 2 mins

Vasai News: रागाच्या भरात माणूस किती क्रूर होऊ शकतो, याचा विदारक अनुभव वसईकरांना आला आहे. एका किरकोळ वादाचे पर्यावसान चार वर्षांच्या लहान मुलावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात झाले आहे. वसई पश्चिमेतील 'अनुपम घर संकुल' सोसायटीमध्ये घडलेल्या या घटनेचा सीसीटीव्ही (CCTV) व्हिडिओ पाहून कोणाचेही काळीज पिळवटून निघेल.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप पवार याचे एका व्यक्तीशी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. या भांडणाचा राग मनात धरून संदीपने संधी साधली आणि त्या व्यक्तीच्या 4 वर्षांचा मुलगा विघ्नेश जेव्हा सोसायटीच्या आवारात खेळत होता, तेव्हा त्याला पकडले. त्यानतंर आरोपी संदीपने विघ्नेशचे डोके रिक्षाच्या लोखंडी अँगलवर जोरात आपटले. त्यानंतर मुलाचा पाय धरून त्याला हवेत भिरकावले आणि जमिनीवर आपटले. इतक्यावरच न थांबता, त्याने त्या निष्पाप जीवाला फरफटत नेल्याचाही आरोप आहे.

Advertisement

(नक्की वाचा-  Vasai News: ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच केला घात; बाईकमुळे महिलेच्या खुनाचा उलगडा)

चिमुरड्याची प्रकृती चिंताजनक

या क्रूर हल्ल्यात विघ्नेश गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला आणि शरीराला अंतर्गत मोठ्या जखमा झाल्या आहेत. सध्या त्याच्यावर मिरा रोड येथील एका खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

(नक्की वाचा-  Exclusive: अशोक खरात प्रकरणात अत्यंत धक्कादायक माहिती; नाशिकचे नामांकित डॉक्टर रडारवर, कारण...)

आरोपीला बेड्या

या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर वसई परिसरात संतापाची लाट उसळली आहे. वसई पोलिसांनी या प्रकरणाची त्वरित दखल घेत आरोपी संदीप पवार याच्याविरोधात हत्येचा प्रयत्न आणि बालकांवरील अत्याचाराच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Topics mentioned in this article