Rahul Gandhi : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या वकिलांनी गुरुवारी पुणे न्यायालयातून, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारधारेच्या लोकांमुळे राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याचा दावा करणारी याचिका मागे घेतली.
राहुल गांधींचे वकील मिलिंद पवार यांनी सांगितले की, न्यायालयाने त्यांची याचिका मागे घेण्याची विनंती स्वीकारली. यापूर्वी, बुधवारी याचिका दाखल केल्यानंतर काही तासांनी त्यांनी सांगितले होते की, ही याचिका गांधी यांच्या परवानगीशिवाय दाखल करण्यात आली होती आणि ती लवकरच मागे घेतली जाईल.
काय आहे प्रकरण?
विनायक दामोदर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याला राहुल गांधी सामोरे जात आहेत. काँग्रेस नेत्याने स्वातंत्र्यसैनिक आणि हिंदुत्ववादी विचारवंत सावरकर यांच्याबद्दल केलेल्या कथित विधानांमुळे हा खटला दाखल झाला आहे. बुधवारी रात्री उशिरा एका प्रसिद्धी पत्रकात, पवार यांनी सांगितले की, त्यांनी गांधी यांच्याशी सल्लामसलत न करता हा अर्ज तयार केला होता आणि गांधींनी "हा अर्ज दाखल करण्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे आणि त्यात दिलेल्या तथ्यांशी असहमती दर्शवली आहे."
( नक्की वाचा : Rahul Gandhi : 'माझ्या जीवाला गंभीर धोका', राहुल गांधी यांचा पुणे कोर्टात खळबळजनक दावा )
बुधवारी पवार यांनी दाखल केलेल्या अर्जात म्हटले होते की, तक्रारदार सात्यकी सावरकर यांनी स्वतः कबूल केले आहे की ते महात्मा गांधींच्या हत्येतील मुख्य आरोपी नथुराम गोडसे आणि गोपाल गोडसे यांच्या मातृवंशतील आहेत. अर्जामध्ये असेही म्हटले होते की, राहुल गांधी लोकसभेतील विरोधी पक्षनेते आहेत आणि त्यांनी नुकतीच दिल्लीत एक पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाने केलेल्या कथित निवडणूक फसवणुकीचे पुरावे देशासमोर ठेवले होते.
या अर्जात पुढे म्हटले होते, "या व्यतिरिक्त, हिंदुत्वाच्या विषयावर संसदीय चर्चेदरम्यान पंतप्रधान आणि राहुल गांधी यांच्यात जोरदार वादविवाद झाला, जो सर्वांना माहीत आहे. या पार्श्वभूमीवर, तक्रारदार, त्यांचे पणजोबा (गोडसे), विनायक सावरकरांच्या विचारधारेचे लोक आणि सावरकरांचे काही अनुयायी जे सध्या सत्तेत आहेत, त्यांच्या मनात गांधींबद्दल शत्रुत्व किंवा रोष असेल यात शंका नाही." पुणे न्यायालयाने राहुल गांधींना या मानहानीच्या प्रकरणात आधीच जामीन दिला आहे आणि खटल्याची सुनावणी सुरू होणे बाकी आहे.
( नक्की वाचा : Independence Day Speech: स्वातंत्र्यदिनी शाळेत भाषण करण्यासाठी लक्षात ठेवा 10 मुद्दे, सर्व करतील तुमचं कौतुक )
सात्यकी सावरकर यांनी गांधींविरोधात तक्रार दाखल केली असून, त्यात आरोप केला आहे की, मार्च 2023 मध्ये लंडनमध्ये दिलेल्या एका भाषणात काँग्रेस नेत्याने दावा केला की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एका पुस्तकात लिहिले आहे की, त्यांनी आणि त्यांच्या पाच-सहा मित्रांनी एका मुस्लिम व्यक्तीला मारहाण केली आणि त्यामुळे त्यांना (सावरकर) आनंद झाला. सात्यकी यांनी म्हटले आहे की, अशी कोणतीही घटना कधीच घडली नाही आणि विनायक दामोदर सावरकर यांनी कधीही, कुठेही असे काहीही लिहिलेले नाही.