
Independence Day Speech for Students : देशभर सध्या 79 व्या स्वातंत्र्यदिनाची तयारी सुरु आहे. या दिवशी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधून भाषण करतील. या भाषणात पंतप्रधान सरकारच्या कार्याचा आढावा तसंच भविष्यातील भारतीयांचं व्हिजन मांडतील. पंतप्रधानांच्या भाषणाची सर्वांनाच उत्सुकता आहे. त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूर, सिंधू नदी जलवाटप करार रद्द, भारक-अमेरिका ट्रेड ऑफ यांसह महत्त्वांच्या मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार? याकडं सर्व जगाचं लक्ष लागलं आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं शाळा, महाविद्यालंय, खासगी आणि सरकारी कार्यालयांमध्ये खास कार्यक्रम आयोजित केले जातात. स्वातंत्र्यदिनी या ठिकाणी ध्वजारोहण केले जाते. शाळांमध्ये या दिवशी खास स्पर्धांचे आयोजन केले जाते.
स्वातंत्र्यदिनी शाळेत आयोजित केलेल्या भाषण स्पर्धेत काय बोलावं? अथवा तुमच्या मुलांना काय भाषण लिहून द्यावं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर काळजी करु नका. आम्ही तुम्हाला स्वातंत्र्यदिनी भाषण करण्यासाठी 10 महत्त्वाचे मुद्दे आणि त्या मुद्यांचा विस्तार करणारं एक नमुना भाषण देणार आहोत. या आधारे भाषण केलं तर तुमच्या भाषणानंतर टाळ्यांचा कडकडाट होईल आणि सर्वजण तुमचं कौतुक करतील.
( नक्की वाचा : Independence Day 2025: यंदाचा स्वातंत्र्यदिन 78 वा आहे की 79 वा? दूर करा सगळ्या शंका )
स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेत भाषण करण्यासाठी 10 महत्त्वाचे मुद्दे
- स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व: १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. हा दिवस देशातील प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाचा दिवस आहे.
- स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण: महात्मा गांधी, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल यांसारख्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचे आणि बलिदानाचे स्मरण करणे.
- महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसेनानी: लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, अशा महाराष्ट्रातील स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या कार्याचा उल्लेख.
- स्वातंत्र्याचा अर्थ: स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय स्वातंत्र्य नसून, सामाजिक, आर्थिक आणि वैचारिक स्वातंत्र्य असणे.
- आव्हाने आणि समस्या: देशासमोर असलेल्या गरिबी, बेरोजगारी, प्रदूषण, भ्रष्टाचार अशा समस्यांचा उल्लेख.
- प्रगती आणि विकास: गेल्या ७८ वर्षांत भारताने विज्ञान, कृषी, शिक्षण, तंत्रज्ञान अशा क्षेत्रात केलेल्या प्रगतीचा गौरव करणे.
- नागरिकांचे कर्तव्य: देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षितता टिकवून ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची आहे हे सांगणे.
- शिक्षण आणि विकास: शिक्षणामुळेच देशाचा विकास शक्य आहे, त्यामुळे प्रत्येक मुलाने शिक्षण घेतले पाहिजे हे पटवून देणे.
- भविष्याची आशा: तरुण पिढीने देशाच्या विकासासाठी काम करण्याची प्रेरणा देणे.
- समारोप: जय हिंद, जय भारत, वंदे मातरम् या घोषणांनी भाषणाचा समारोप करणे.
( नक्की वाचा : Independence Day 2025: ए मेरे वतन के लोगों गीत अन् लता-आशांचं झालेलं कडाक्याचं भांडण, काय आहे 'तो' किस्सा? )
स्वातंत्र्यदिनाचे संपूर्ण भाषण
आदरणीय मुख्याध्यापक, सन्माननीय शिक्षक वर्ग आणि माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो,
आज 15 ऑगस्ट, आपला स्वातंत्र्यदिन! या पवित्र दिनी तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा! आजचा दिवस म्हणजे आपल्या देशाच्या इतिहासातील एक सुवर्ण क्षण. आजच्याच दिवशी, १९४७ साली, कित्येक वर्षांच्या संघर्षानंतर भारताला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले.
स्वातंत्र्य म्हणजे केवळ 15 ऑगस्टला झेंडा फडकवून पेढे वाटणे इतकंच नाही. स्वातंत्र्य म्हणजे आपलं स्वतःचं सरकार असणे, आपल्या देशाचे निर्णय आपणच घेणे. पण हे स्वातंत्र्य आपल्याला सहज मिळालं नाही, त्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी आपलं जीवन समर्पित केलं. महात्मा गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने, तर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांनी क्रांतीच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी संघर्ष केला. सुभाषचंद्र बोस यांच्या 'तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आझादी दूंगा' या घोषणेने लाखो तरुणांना प्रेरणा दिली. या सर्व महान नेत्यांच्या त्यागामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा अनुभव घेत आहोत.
महाराष्ट्राचा इतिहासही स्वातंत्र्यलढ्याच्या योगदानाने समृद्ध आहे. लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!' ही सिंहगर्जना करून स्वातंत्र्यसंग्रामात चैतन्य आणले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या ‘काळ्या पाण्याची' शिक्षा भोगूनही देशासाठी आपलं जीवन समर्पित केलं. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगून सामाजिक स्वातंत्र्याची मशाल पेटवली. या सर्व नेत्यांच्या योगदानाला आपण कधीही विसरू शकत नाही.
गेल्या 78 वर्षांत भारताने अनेक क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये आपण जगात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कृषी, शिक्षण आणि उद्योग अशा अनेक क्षेत्रातही आपण मोठी प्रगती केली आहे. आज आपला देश एक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
पण मित्रांनो, आपल्याला हेही लक्षात ठेवलं पाहिजे की, आपल्या देशासमोर आजही काही नवीन आव्हाने आहेत. गरिबी, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि प्रदूषण यांसारख्या समस्यांवर आपल्याला एकत्र येऊन मात करायची आहे. देशाला पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आता आपल्या तरुण पिढीच्या खांद्यावर आहे. आपल्याला एक चांगला नागरिक बनून आपल्या देशाची प्रगती, एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
मित्रांनो, आज आपण शपथ घेऊया, की आपण आपल्या देशासाठी आणि समाजासाठी काम करू. आपण एक चांगला नागरिक बनून आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करू.
जय हिंद! जय भारत! वंदे मातरम्!
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world