Palghar News: अरबी समुद्रात गुजरात किनाऱ्याजवळ समुद्राचे पाणी जोरात फिरत असून बुडबुडे येत असल्याच्या प्रकारामुळे प्रशासन आणि मच्छीमारांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. वसईतील पाचूबंदर येथील मच्छीमार बोट मासेमारीसाठी समुद्रात गेलेली असताना 11 जानेवारी रोजी या रहस्यमय प्रवाहाच्या संपर्कात आली, मात्र खोल समुद्रात मोठ्या आकाराचे गोलाकार पाण्याचे रिंगण निर्माण झाल्याचे व्हिडिओद्वारे समोर आल्यानंतर या घटनेला एक आठवडा उलटून देखील हा प्रवाह नेमका कशामुळे निर्माण झाला, याबाबत कोणत्याही यंत्रणेकडून ठोस माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे परिसरातील मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मच्छीमारांनी शूट केला व्हिडिओ
वसईतील पाचूबंदर येथील कृष्णा मोरलीखांड्या यांच्या मालकीची ‘ओम नमः शिवाय' नावाची मच्छीमार बोट मासेमारीसाठी समुद्रात गेलेली असताना या रहस्यमय प्रवाहाच्या संपर्कात आली. किनाऱ्यापासून 66 नॉटीकल मैल अंतरावर त्यांना पाण्यात तयार झालेल्या मोठ्या वर्तुळाचा सामना करावा लागला. या ठिकाणी गढूळ असल्यासारखे मातकट रंगाचे पाणी वेगाने फिरताना दिसून आले. काही काळ बोट त्या प्रवाहात अडकली होती. मात्र मच्छीमारांनी प्रसंगावधान राखत इंजिनाचा वेग वाढवून बोट सुरक्षितपणे बाहेर काढली. त्यावेळी मच्छीमारांनी चित्रीत केलेल्या व्हिडिओंमध्ये समुद्राचे पाणी जणू काही उकळ्या घेत असल्यासारखे दिसत आहे.
VIDEO
समुद्रातील ही हालचाल कशामुळे?
पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी ही घटना अत्यंत असामान्य असून सखोल चौकशीची गरज असल्याचे सांगितले. समुद्रतळावरील वायूगळती, पाण्याखालील भूगर्भीय हालचाल किंवा समुद्राखालील पाइपलाइनमधील गळती यामुळे हा प्रकार घडला असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सागरी प्राधिकरणांशी समन्वय साधला जात असून, संबंधित परिसरात जाणाऱ्या जहाजे आणि मासेमारी नौकांना विशेष सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे कदम यांनी म्हटले आहे.
तर, याबाबत मत्स्य व्यवसाय विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त दिनेश पाटील यांनी “घटनेची माहिती त्वरित नौदल आणि तटरक्षक दलाला देण्यात आली आहे. शिवाय NIO म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशोनोग्राफी यांनादेखील कळवली आहे. मात्र ही भूकंपाशी संबंधित घटना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ओएनजीसीच्या गॅसलाईनमुळे असा प्रवाह निर्माण झाला असण्याची शक्यता आहे. परंतु याबाबत अद्याप ठोस माहिती प्राप्त झालेली नाही.” असे ते म्हणाले.
तर, समुद्रातील सदर हालचाल ही समुद्राखालील पाइपलाइनशी संबंधित असण्याची शक्यता वाटते. मात्र, याची खात्री करण्यासाठी भूभौतिकीय (जिओफिजिकल) अभ्यास करणे आवश्यक ठरेल. त्यामुळे या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी कृपया CSIR–NIO (राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था) यांच्या संचालकांना कळवावे, अशी विनंती राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेच्या प्रभारी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सोनिया सुकुमारन यांनी मत्स्य व्यवसाय विकास विभागाला ई-मेल द्वारे कळविले आहे.
त्यामुळे समुद्रातील या विचित्र घटनेबाबत प्रशासनाने तातडीने चौकशी करून हा प्रकार नेमका काय आहे याविषयी नागरिकांना माहिती देणे गरजेचे आहे. मच्छीमार बांधवांमधील भीतीचे वातावरण दूर होईल आणि यामुळे होणारे अपघात देखील टळू शकतात.