Palghar Rain Viral Video : राज्यभर सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विरार पश्चिमेतील विवा कॉलेज परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून संपूर्ण परिसर जलमय झाला आहे.अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून काही निवासी इमारतींच्या तळमजल्यांमध्येही पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.रस्त्यांवर गुडघाभर ते कंबरभर पाणी साचल्याने वाहनांची वाहतूक मंदावली असून अनेक ठिकाणी वाहने बंद पडल्याचेही समोर आले आहे.नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले असून दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत.
विद्युत प्रवाहाचा धोका आणि..
दरम्यान,काही युवक या पाण्यात उतरून पोहण्याचा आणि पावसाचा आनंद घेताना दिसत आहेत.मात्र, प्रशासनाने अशा प्रकारचे धोकादायक कृत्य टाळण्याचे आवाहन केले आहे.पाण्याखाली उघडी गटारे,विद्युत प्रवाहाचा धोका आणि वेगवान पाण्याच्या प्रवाहामुळे कोणतीही दुर्घटना घडू शकते. महानगरपालिका आणि आपत्कालीन यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचे,अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नक्की वाचा >> Dombivli News: डोंबिवलीत खळबळ! 15 लाखांची खंडणी घेताना चार RTI कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडलं, प्रकरण काय?
इथे पाहा पुराच्या पाण्याचे भयानक व्हिडीओ
वसई पूर्वेकडील मधुबन परिसरातही सखल भागात पाणी साचलं आहे.परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाच्या पथकाने तात्काळ बचावकार्य सुरू केले.दोऱ्यांच्या साहाय्याने जवानांनी पाण्याखाली गेलेल्या भागात पोहोचून अंदाजे 20 ते 25 जणांना वाचवले.