भारतीय हवामान विभागाने (IMD) आज, शुक्रवार २५ जुलै २०२५ रोजी सकाळी ७.२० वाजता मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांसाठी इशारा जारी केला आहे. या इशाऱ्यानुसार, पुढील ३ ते ४ तासांत मुंबई , ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमधील काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट दिलेला असून पुढील ३-४ तासांत या जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.
हवामान विभागाकडून (IMD) दिला जाणारा एक तात्काळ हवामान अंदाज आहे. साधारणपणे पुढील काही तासांसाठी विशिष्ट क्षेत्रासाठी हा दिला जातो, ज्यामुळे नागरिकांना अचानक बदलणाऱ्या हवामानाबद्दल त्वरित माहिती मिळते. सकाळी जारी करण्यात आलेल्या या इशाऱ्यामुळे या तीन जिल्ह्यांतील नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सध्या महाराष्ट्रात मान्सून सक्रिय असून, अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरू आहे. मुंबई आणि उपनगरांत गेल्या काही दिवसांपासून पावसाने सातत्याने हजेरी लावली आहे. ज्यामुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशा परिस्थितीत, 'नाऊकास्ट' इशारा मिळाल्याने नागरिकांना घराबाहेर पडण्यापूर्वी आवश्यक ती खबरदारी घेण्यास मदत होईल. कामावर जाणाऱ्या आणि प्रवास करणाऱ्या लोकांसाठी हा इशारा महत्त्वाचा आहे.
IMD च्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचा आवाहन केले आहे. विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असल्याने सुरक्षित ठिकाणी थांबावे आणि झाडांखाली किंवा जीर्ण इमारतींखाली थांबणे टाळावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.