'झिंगाडा परतला!' 9 जणांच्या अटकेनंतर समोर आलं अंडरवर्ल्डचं सर्वात खतरनाक नाव; मुंबईवर पुन्हा सावट?

Who is Munna Jhingada?: मुंबई अंडरवर्ल्डचा एकेकाळचा सर्वात खतरनाक शार्प शूटर आणि दाऊद इब्राहिमचा उजवा हात मानला जाणारा मुन्ना झिंगाडा पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Who is Munna Jhingada? : मुन्ना झिंगाडा जुना आणि नवा फोटो
मुंबई:

Who is Munna Jhingada?: मुंबई अंडरवर्ल्डचा एकेकाळचा सर्वात खतरनाक शार्प शूटर आणि दाऊद इब्राहिमचा उजवा हात मानला जाणारा मुन्ना झिंगाडा पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. दिल्ली पोलिसांनी नुकत्याच उधळून लावलेल्या आयएसआय (ISI) आणि दाऊद इब्राहिमच्या दहशतवादी कटात मुन्ना झिंगाडाचे नाव समोर आल्याने भारतीय सुरक्षा यंत्रणा सावध झाल्या आहेत. मुंबईच्या जोगेश्वरीतील गल्ल्यांमधून सुरू झालेला मुन्नाचा प्रवास आता थेट पाकिस्तानमधून भारतावर हल्ले करण्यापर्यंत पोहोचला आहे.

कोण आहे हा मुन्ना झिंगाडा?

मुन्ना झिंगाडा, ज्याचे खरे नाव सय्यद मुदस्सर हुसेन आहे, हा मूळचा मुंबईतील जोगेश्वरीचा रहिवासी. 90 च्या दशकात दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलच्या गँगमध्ये तो एक अत्यंत घातक शूटर म्हणून ओळखला जात असे. दाऊदचा त्याच्या अचूक निशाण्यावर इतका विश्वास होता की, टोळीतील सर्वात कठीण कामं मुन्नाकडेच सोपवली जायची. त्याच्यावर खून, खंडणी आणि गँगवॉरशी संबंधित 70 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.

Advertisement

छोटा राजनवरील तो थरारक हल्ला

मुन्ना झिंगाडा खऱ्या अर्थाने चर्चेत आला ते वर्ष 2000 मध्ये. बँकॉकमध्ये छोटा राजनवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा तो मुख्य सूत्रधार होता. बनावट पासपोर्टच्या आधारे तो थायलंडला पोहोचला होता. 

या हल्ल्यात छोटा राजन थोडक्यात वाचला, पण त्याचा जवळचा सहकारी रोहित वर्मा मारला गेला. या हल्ल्यानंतर थायलंड पोलिसांनी मुन्नाला अटक केली, तेव्हा त्याच्याकडे 'मोहम्मद सलीम' नावाचा पाकिस्तानी पासपोर्ट सापडला होता.

भारत आणि पाकिस्तानमधील कायदेशीर युद्ध

मुन्ना झिंगाडाच्या अटकेनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये त्याला ताब्यात घेण्यासाठी मोठी कायदेशीर लढाई सुरू झाली. भारताने मुन्ना हा मुंबईचा नागरिक असल्याचे पुरावे सादर केले, तर पाकिस्तानने तो आपला नागरिक असल्याचा दावा लावून धरला. 

तब्बल 20 वर्षे बँकॉकच्या तुरुंगात राहिल्यानंतर, थाई न्यायालयाने त्याला पाकिस्तानी नागरिक मानले. हा भारतासाठी मोठा धक्का होता, कारण मुन्ना हा डी-कंपनीचा मोठा गुंड आहे.

Advertisement

कराचीमधून नव्या हल्ल्याचे प्लॅनिंग

2019 मध्ये बँकॉकच्या तुरुंगातून सुटल्यानंतर आयएसआयने मुन्नाला थेट कराचीला नेले. तिथे पोहोचताच तो पुन्हा दाऊदच्या नेटवर्कमध्ये सामील झाला. दिल्ली पोलिसांनी पकडलेल्या 9 दहशतवाद्यांच्या चौकशीत असे समोर आले आहे की, मुन्ना झिंगाडा आता पाकिस्तानमध्ये बसून भारतविरोधी कारवायांचे सूत्रसंचालन करत आहे. दिल्ली, मुंबई आणि इतर मोठ्या शहरांमध्ये घातपात घडवून आणण्याचे काम मुन्ना आणि त्याच्या सहकाऱ्यांकडे सोपवण्यात आले आहे.

अंडरवर्ल्ड आणि दहशतवादाचे घातक समीकरण

मुंबई बॉम्बस्फोटांनंतर दाऊद गँगने ज्या पद्धतीने दहशतवादी वळण घेतले, त्याचाच मुन्ना झिंगाडा हा एक महत्त्वाचा भाग आहे. केवळ गँगस्टर म्हणून ओळखला जाणारा मुन्ना आता थेट आयएसआयच्या इशाऱ्यावर दहशतवादी मॉड्युल्स हाताळत आहे. भारताच्या सुरक्षेसाठी मुन्ना झिंगाडा हे नाव पुन्हा एकदा मोठं आव्हान ठरत असून, सुरक्षा यंत्रणा आता त्याच्या नेटवर्कचा शोध घेत आहेत.
 

Advertisement