प्रतिनिधी, निलेश बंगाले
वाढत्या उन्हाळ्यामुळे दु्ष्काळी भागातील पाणी प्रश्न ही मोठी समस्या म्हणून उभी राहिली आहे. राज्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची कमतरता पाहायला मिळत आहे. लांब जाऊन गावकऱ्यांना पाणी भरून आणावं लागतं. त्यामुळे आधीच उन्हाचा तडाखा आणि त्यात पाणी टंचाई अशा दुहेरी समस्यांना गावकऱ्यांना तोंड द्यावं लागत आहे. वर्ध्यातील आष्टी तालुक्यातील बोरखेडी व इतर आठ गावांना एक वेगळेच ग्रहण लागलेलं आहे. या ग्रहणामुळे येथील शाळकरी मुलांना खेळता येत नाही. लग्नाचं वय असलेल्या तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाही आणि सर्वात धक्कादायक म्हणजे याच ग्रहणामुळे काही ग्रामस्थांनी आपलं गावं सुद्धा सोडलं आहे. वर्ध्याच्या आष्टी तालुक्यात असलेल्या बोरखेडी या गावात सध्या एक समस्या मोठी गंभीर बनली आहे. या गंभीरतेचं स्वरूप दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. ही समस्या आहे पाण्याची. या गावात पिण्यासाठी, आंघोळीसाठी, जनावरांसाठी पाणीच मिळत नसल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
त्याहूनही भीषण वास्तव म्हणजे या गावात पाणी नसल्याने सकाळपासूनच गावातील महिलांना पाण्यासाठी जंगलात जावं लागतं. या गावात लग्नासाठी कोणी मुली द्यायला तयार नाहीत. त्यामुळे गावात लग्नाळू तरुणांची संख्या वाढत आहे.तर दुसरीकडे गावात मजुरांची संख्या जास्त असल्यामुळे व मजुरांना बहुतांश वेळा पाण्यासाठी व्यस्त राहावे लागत असल्याने त्यांची मजुरीही बुडत आहे.परिणामी त्यांच्या उपजीविकेचा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचसोबत लहान मुलांनाही या पाणी भरायला जावं लागत लागत असल्याने त्यांना सुद्धा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. खेळण्याच्या वयात त्यांना विहिरीवरून पाणी आणावे लागत असल्याने मुलांचा हिरमोड होत आहे.
नक्की वाचा - मे महिन्यात उष्णतेच्या लाटेचे दिवस सरासरीपेक्षा जास्त; हवामान विभागाकडून इशारा
1962 पासून बोरखेडी आणि इतर गावांना पाण्याच्या समस्येला सामोरं जावं लागत असल्याचं येथील गावकरी सांगतात. 1962 पासून गावातील पाणी प्रश्न सुटावा यासाठी गावातील महादेव तायवाडे यांनी वयाच्या 22 व्या वर्षी पासून केलेला पत्रव्यवहार पाहायला मिळतो.आज महादेव तायवाडे हे 88 वर्षाचे आहे पण अजूनही या गावाची समस्या काही निकाली लागली नाही. गावात पाणी मिळावं यासाठी वयाच्या 22 व्या वर्षीपासून महादेव तायवाडे यांच्याकडून सरकारदरबारी पत्रव्यवहार करण्यात आला. आज या पत्रव्यवहाराला 66 वर्षे उलटली तरीही येथील पाणीप्रश्न सुटला नसल्याचं तायवाडे यांच्याकडून सांगण्यात आलं.