Chhatrapati Sambhajinagar: हॉटेलवर गाडी थांबताच नवरी फरार; शेतकरी नवऱ्याची लाखोंची फसवणूक

Chhatrapati Sambhajinagar Crime News: वाटेत वन्हाड येथे चहापानासाठी थांबताच नवरी अचानक गाडीतून उतरून दुसऱ्या महागड्या वाहनात बसून फरार झाली. कुटुंबीयांनी शोधाशोध केली, मात्र ती कुठेच आढळली नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins

सुमीत पवार, छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar Crime News: शेतकरी तरुणाला लग्नाचं आमीष दाखवून लाखो रुपयांची लूट केल्याचा प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आला आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शेतकरी दांपत्याने आपल्या मुलाचे लग्न एका परिचित महिलेच्या माध्यमातून ठरवले. त्या महिलेने ओळखीतील मुलगी असल्याचे सांगत आरोपी ज्योती राजू गायकवाड हिचा संपर्क क्रमांक दिला.

फिर्यादी कुटुंबीयांनी 23 सप्टेंबर रोजी सिडको एन-6 भागात ज्योतीच्या घरी भेट दिली. तिथे ज्योती, रेखा मिसाळ आणि नवरी म्हणून माया मधुकर शिंदे हजर होत्या. मुलीच्या वडिलांचे निधन झाले असून आईवर उपचार सुरू असल्याचे सांगून आरोपींनी सहानुभूती मिळवली. मुलगी आवडल्याने बोलणी निश्चित झाली. आरोपींनी मुलीच्या आईच्या उपचारांसाठी व लग्नातील खर्चासाठी 1.80 लाख रुपयांची मागणी केली. याशिवाय दागिने, कपडे आणि इतर खर्च मिळून तब्बल 3 लाख 86 हजार रुपयांचा व्यवहार झाला.

(नक्की वाचा-  Viral VIDEO: समोसा विक्रेत्याचा माज! UPI पेमेंट फेल झाल्याने प्रवाशाला मारहाण, घड्याळही घेतलं)

25 सप्टेंबर रोजी जिल्हा न्यायालयासमोर कोर्ट मॅरेज करण्यात आले. तलवार नावाच्या वकिलाने कागदपत्रे घेऊन 12 हजार रुपये फी घेतली. त्यानंतर कुटुंबीय नववधूसह सिन्नरकडे निघाले. वाटेत वन्हाड येथे चहापानासाठी थांबताच नवरी अचानक गाडीतून उतरून दुसऱ्या महागड्या वाहनात बसून फरार झाली. कुटुंबीयांनी शोधाशोध केली, मात्र ती कुठेच आढळली नाही.

बदनामीच्या भीतीने काही दिवस त्यांनी तक्रार दिली नाही. मात्र, कोपरगाव येथे अशाच पद्धतीने लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणारी टोळी अटकेत असल्याचे समजल्यावर त्यांनी चौकशी केली. तेव्हा तीच महिला टोळी असल्याचे स्पष्ट झाले. अखेर त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Advertisement

या प्रकरणी पोलिसांनी ज्योती गायकवाड, माया शिंदे आणि सविता मधुकर शिंदे या तिघींविरोधात गुन्हा नोंदवला आहे. सिडको पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांनी सांगितले की, आरोपी महिलांनी इतर जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारे अनेकांना फसवले असण्याची शक्यता असून पुढील तपास सुरू आहे.

Topics mentioned in this article