छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मराठा आरक्षण मिळत नसल्याचा उल्लेख देखील या तरुणाने आपल्या सुसाईड नोटमध्ये केला आहे. दत्ता महिपाल असं 25 वर्षीय आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे.
एकीकडे मराठा आरक्षण मिळत नाही, दुसरीकडे डोक्यावर कर्ज वाढल्याने भावाला व्हॉट्सऍप करत दत्ता महिपाल या तरुणाने टोकाचा निर्णय घेतला आहे. दत्ता मराठा आंदोलनात देखील सक्रीय होता. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा देखील दाखल असल्याची माहिती मिळत आहे. तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील होता मात्र सध्या संभाजीनगरच्या वाळूज भागातील वडगाव कोल्हाटी गावात राहत होता.
Datta Mahipal Note
सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं?
"मी, दत्ता कालिदास महिपाल पाटील, काही कारणास्तव फाशी घेत आहे. गोपाळा अर्बन माजलगाव या बँकेकडून मी एक लाख रुपायंचे कर्ज घेतले होते. मात्र काही कारणांमुळे मी काही हफ्ते भरु शकलो नाही. कर्जवसुलीसाठी मला रोज फोन येत होते. याचा मला खूप त्रास झाला."
"अनेकजण कर्ज बुडवतात मात्र त्यांना कुणी बोलत नाही. शेतकऱ्यांना मात्र सर्व बोलतात. दुसरे कारण म्हणजे मराठा आरक्षण मिळत नाही, कारण काय आहे. मी उपोषण करुन काय फायदा झाला नाही. सरकारने याची भरपाई करावी. सॉरी मम्मी-पप्पा, सुखी राहा."