Chhatrapati Sambhajinagar: पोलीस भरतीचे स्वप्न धुळीला! सराव करताना तरुणावर काळाचा घाला

Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरच्या पैठण-पाचोड रोडवर पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या सुशांत भोजने या तरुणाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. बेपत्ता झाल्याच्या तक्रारीनंतर दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह आढळून आला.

जाहिरात
Read Time: 2 mins

Chhatrapati Sambhajinagar: पोलीस दलात भरती होण्याचे ध्येय उराशी बाळगलेल्या एका तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे. पैठण तालुक्यातील सुशांत संतोष भोजने (२०) या तरुणाचा सराव करत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. या घटनेमुळे वरुडी आणि दावरवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

मूळचा वरुडी येथील असलेला सुशांत सध्या दावरवाडी शिवारात वास्तव्यास होता. गेल्या सहा महिन्यांपासून तो जिद्दीने पोलीस भरतीची तयारी करत होता. दररोज पहाटे पैठण-पाचोड रस्त्यावर धावण्याचा सराव करण्यासाठी सुशांत जात असे. सोमवारी पहाटे तो नेहमीप्रमाणे घराबाहेर पडला, मात्र बराच वेळ झाला तरी तो घरी परतला नाही. कुटुंबीयांनी शोध घेऊनही तो न सापडल्याने अखेर पाचोड पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार करण्यात आली होती.

(नक्की वाचा-  Crime News: बदलापुरात खळबळ! चित्रकला स्पर्धेचं आमीष दाखवून पालकांसह मुलांना बोलावलं अन्...)

रडवणाऱ्या वास्तवाचा खुलासा

मंगळवारी दुपारी राहटगाव शिवारातील मोसंबी बागेजवळ रस्त्याच्या कडेला एका तरुणाचा मृतदेह असल्याची माहिती समोर आली. नातेवाईकांनी तिथे धाव घेतली असता तो सुशांत असल्याचे स्पष्ट झाले. प्राथमिक माहितीनुसार, पहाटे अंधारात धावत असताना एखाद्या अज्ञात भरधाव वाहनाने त्याला जोराची धडक दिली असावी, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

(नक्की वाचा-  Pune News: पुणेकरांवर येणार पाणी संकट! पुणे शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा, काय आहे प्रकरण?)

कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

सुशांतच्या निधनाची बातमी समजताच भोजने कुटुंबावर आभाळ कोसळले. आपल्या तरुण मुलाचा मृतदेह पाहून आई-वडिलांनी फोडलेला हंबरडा उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे हृदय पिळवटून टाकणारा होता. पोलीस दलात जाऊन आई-वडिलांचे नाव रोशन करण्याचे सुशांतचे स्वप्न अपुरेच राहिले.सध्या पाचोड पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, धडक देऊन पसार झालेल्या अज्ञात वाहनाचा शोध सुरू केला आहे.
 

Advertisement
Topics mentioned in this article