पुण्यात झिकाचा सातवा रूग्ण आढळला आहे. 2 जुलैपर्यंत पुण्यात झिकाच्या सहा रूग्णांची नोंद करण्यात आली होती. त्यात आणखी एका रूग्णाची भर पडली आहे. आता पुण्यात झिकाच्या रूग्णांची संख्या सातपर्यंत पोहोचली आहे. पुण्यातील एका 55 वर्षीय महिलेला झिका विषाणूची बाधा झाली आहे. आता पुण्यात एकूण रुग्णांची संख्या सातपर्यंत पोहोचली आहे.
पुण्यात सोमवारी झिकाची सहा प्रकरणं नोंदवली गेली होती. त्यापैकी दोन रुग्ण गर्भवती महिला होत्या. सातव्या प्रकरणात महिलेच्या अंगावर पुरळ उठल्याचं दिसून येत आहे. शिवाय तिला सांधेदुखीचा त्रास होत आहे. आज तिचा अहवाल झिका व्हायरससाठी पॉझिटिव्ह आला आहे. महिलेची तब्येत स्थिर आहे. तिला रूग्णालयात दाखल करण्याची गरज नसल्याचं सांगितलं जात आहे.
नक्की वाचा - 'सुंदर'मुळे बारामतीत घडला रक्तरंजित संघर्ष; रणजित निंबाळकरांसोबत नेमकं काय घडलं?
आतापर्यंत नोंदविलेल्या रूग्णांमध्ये फारशी ठळक लक्षणं दिसून आली नव्हती. मात्र सातव्या प्रकरणात झिकाची लक्षणं दिसून येत आहे. महिलेच्या अंगावर पुरळ उठणे, सांधेदुखीचा त्रास होत असल्याची माहिती आहे. एरंडवणे येथे राहणाऱ्या दोन गर्भवती महिलांचा समावेश आहे. शनिवारी देखील एरंडवणे येथे एक गर्भवती महिला आणि मुंढवा येथील 22 वर्षीय तरुणाला झिका व्हायरसची लागण झाली होती.
पुणे महानगरपालिकेच्या (पीएमसी) आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बलिवंत यांनी सांगितले की, गोळा केलेल्या 25 सॅम्पल्सपैकी 12 एरंडवणे येथील असून त्यात सात गरोदर महिलांचा समावेश आहे. यापैकी दोन गर्भवती महिलांमध्ये झिका पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. मुंढवा येथून अतिरिक्त 13 सॅम्पल्स गोळा करण्यात आले.
झिका व्हायरसची लक्षणे ?
- एडिस एजिप्ती नावाच्या डासामुळे झिका व्हायरसचा संसर्ग होतो.
- झिका व्हायरसचा संसर्ग झाल्यानंतर या आजाराची लक्षणे तीन -14 मध्ये निदर्शनास येतात.
- झिका व्हायरसची लागण झालेल्या बहुतांश रुग्णांमध्ये लक्षणे दिसून येत नाहीत.
- ताप येणे, त्वचेवर पुरळ येणे, डोळ्यांतील बुबुळाच्या पुढील भागामध्ये जळजळ होणे, स्नायूदुखी, सांधेदुखी, अस्वस्थता आणि डोकेदुखी यासारखी लक्षणे आढळतात.