देवा राखुंडे, प्रतिनिधी
पुण्यातील बारामती तालुक्यातील निंबुत येथे 37 लाखांच्या बैल खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून झालेल्या गोळीबार प्रकरणातील जखमी रणजीत निंबाळकर यांचा शनिवारी पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला. निंबाळकर यांच्या मृत्युमुळे त्यांच्या नऊ महिन्यांच्या मुलीचे पितृछत्र हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. बारामती तालुक्यातील निंबुत येथे शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास बैल खरेदी-विक्रीच्या झालेल्या व्यवहारातून फलटण येथील रणजित निंबाळकर यांच्या डोक्यात गौरव काकडे याने गोळी झाडली होती. त्यांच्यावर पुण्यात खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान निंबाळकर यांचा मृत्यू झाला.
निंबाळकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातलगांसह हजारो समर्थकांची वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यावर एकच गर्दी केली. आरोपी गौतम काकडेला अटक करा, शिवाय सुंदर बैल मुळ मालकाला परत करा; अशी मागणी जमावासह निंबाळकर कुटुंबाने लावून धरली. शुक्रवारी रात्री रणजीत निंबाळकर, अंकिता निंबाळकर आणि नऊ महिन्यांची मुलगी अंकुरण निंबाळकर हे निंबुत येथे काकडे यांच्या घरी पैशाच्या व्यवहारासाठी गेले होते. याच वेळी वाद झाला अन् नऊ महिन्याच्या मुलीसमोरच अंकिता निंबाळकर यांच्या पतीच्या डोक्यात गौरव काकडे याने गोळी झाडली. या घटनेत रणजित निंबाळकरांचा मृत्यू झाल्याने नऊ महिन्यांची मुलगी अंकुरण बापाला पोरकी झाली. गुन्हेगारांना शिक्षा करा, मला न्याय हवा आहे अशी मागणी अंकिता निंबाळकर यांनी केली आहे.
त्या दिवशी नेमकं काय घडलं?
रणजीत निंबाळकर यांनी 'सुंदर' नावाचा बैल आरोपी गौतम काकडे यांना 37 लाख रुपयांना विकला होता. त्यानंतर पाच लाख रुपये विसार म्हणून दिले होते. उर्वरित रक्कम 27 जून रोजी नेण्यासाठी बारामती तालुक्यातील निंबुत येथे त्यांच्या घरी बोलवले होते. त्यानुसार रात्री अकराच्या सुमारास रणजीत निंबाळकर फिर्यादी अंकिता निंबाळकर व त्यांची नऊ महिन्यांची मुलगी अंकुरण हे निंबुत येथे गौतम काकडे यांच्याकडे गेले होते. याच वेळी व्यवहाराचे रुपांतर वादात झालं आणि वाद निकोपाला गेला. एकतर व्यवहार पुरा करा किंवा तुमचा अॅडवान्स परत देतो. मला माझा बैल परत द्या म्हणून रणजित निंबाळकर म्हणाले. याच वेळी गौरव काकडे यांनी रणजित निंबाळकर यांच्याकर गोळी झाडली. उपचारदरम्यान रणजित निंबाळकर यांचा मृत्यू झाला. वडगाव निंबाळकर पोलिसांनी या प्रकरणी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे आणि त्यांचा मुलगा गौरव काकडे याला अटक केली आहे. तर गौतम काकडे याचा शोध सुरू आहे.
नक्की वाचा - दारू सोडवायला भोंदू बाबाकडे गेला, बाबाने धू धू धुतला; Video तुफान व्हायरल!
कोण होते रणजित निंबाळकर ?
रणजित निंबाळकर हे फलटण परिसरात सर या नावाने परिचित होते. ते फलटन येथे ज्ञानज्योती करिअर अकॅडमी चालवत होते. यात सैन्य व पोलीस दलातील भरतीपूर्व प्रशिक्षण दिले जात होते. गेल्या दीड ते दोन वर्षांपासून बैलगाडा शर्यतीत उतरले होते. त्यामुळे बैलगाडा क्षेत्रात ते नावारुपाला आले होते. निंबाळकर यांकडे असणारा सुंदर बैल पश्चिम महाराष्ट्रात प्रसिद्ध होता. सुंदरला त्यांनी माळशिरसमधून 21 लाखांना विकत घेतलं होतं. बैलांच्या कितीही जोड्या असल्या तरी त्यातून सुंदर सर्वांचं लक्ष वेधून घ्यायचा. सुंदरने अनेक मैदानं गाजवली होती. यामुळेच रणजीत निंबाळकर यांचा बैलगाडा शर्यतीत बोलबाला होता. वर्षभरापूर्वी निंबाळकरांनी सर्जा बैलासाठी काकडेंसोबत 61 लाख रुपयांचा व्यवहार केला होता. यामुळे निंबाळकर आणि काकडे कुटुंबाची जवळीक वाढली. बैलगाडा क्षेत्रातील सर्वात मोठा व्यवहार असल्याची चर्चा त्यावेळी झाली होती. यानंतर सर्जा आणि सुंदर यांच्या जोडीनं महाराष्ट्रातील अनेक मैदानं मारली. याच सुंदर बैलाच्या विक्रीच्या व्यवहारातून निंबाळकर आणि काकडे यांच्यात वाद झाला. वादाच रूपांतर थेट गोळीबारात झालं आणि या व्यवहाराचा शेवट रक्तरंजित लढाईने झाला.
ही सर्व घटना घडलीय सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे यांच्या घरात, काकडे घराण्याचा इतिहास काय?
राज्याच्या राजकारणात बारामतीच्या निंबुत येथील काकडे घराण्याची विशेष ओळख आहे. सत्ता कुणाचीही असो, मंत्रिमंडळात निंबुतच्या काकडेंचे निम्मे अर्धे नातेवाईक असतातचं. स्वर्गीय मुघुटराव साहेबराव काकडे यांनी 1962 मध्ये सोमेश्वर सहकारी साखर कारखाना उभारला. मुघुटराव काकडे यांचे बंधू बाबालाल काकडे माजी खासदार स्वर्गीय संभाजीराव काकडे यांचा राज्याच्या राजकारणात कायम दबदबा राहिला. मुघुटराव काकडे यांचे पुत्र शहाजी काकडे यांनी जेष्ट नेते शरद पवारांविरोधात विधानसभा लढवली होती. शहाजी काकडे यांनी अनेक वर्ष सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष पद सांभाळले आहे. गौतम आणि गौरव ही शहाजी काकडे यांची दोन मुले आहेत. त्यापैकी गौतम काकडे फरार आहे तर शहाजी काकडे आणि गौरव काकडे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world