Cockroach Janta Party ट्रेंडमध्ये, महाराष्ट्रातील झुरळे गोपीनाथ मंदिराचीही प्रचंड चर्चा, झुरळांना मानतात देव

परळीतील वैद्यनाथ मंदिर परिसरात असलेले ‘झुरळे गोपीनाथ’मंदिर हे श्रद्धा,इतिहास आणि रहस्य यांचा संगम मानले जाते. जवळपास तीनशे वर्षांपूर्वीचे मानले जाणारे हे मंदिर इतर देवस्थानांपेक्षा वेगळं ठरतं.

जाहिरात
Read Time: 2 mins
Zurale Gopinath Mandir News Today

आकाश सावंत, प्रतिनिधी

Zurale Gopinath Mandir : सध्या सोशल मीडियावर ‘कॉक्रोच जनता पार्टी'हा शब्दप्रयोग मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.राजकीय टोलेबाजी, मीम्स आणि विनोदी पोस्टमधून झुरळांचा उल्लेख केला जात असताना,बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथे मात्र झुरळांशी जोडलेली एक अनोखी आणि शतकांपासून जपली गेलेली धार्मिक परंपरा पुन्हा चर्चेत आली आहे.परळीतील वैद्यनाथ मंदिर परिसरात असलेले ‘झुरळे गोपीनाथ'मंदिर हे श्रद्धा,इतिहास आणि रहस्य यांचा संगम मानले जाते. जवळपास तीनशे वर्षांपूर्वीचे मानले जाणारे हे मंदिर इतर देवस्थानांपेक्षा वेगळे ठरते,कारण येथे झुरळांना हाकलले जात नाही, तर त्यांना पवित्र मानले जाते.

सामान्यतः घरात झुरळ दिसताच लोक त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात.मात्र या मंदिरात गाभारा,भिंती आणि मूर्ती परिसरात झुरळांचा मुक्त वावर दिसून येतो. स्थानिक श्रद्धेनुसार ही झुरळे कोणालाही त्रास देत नाहीत.उलट एखाद्या भाविकाच्या अंगावर झुरळ पडल्यास ते शुभ संकेत मानले जातात.या परंपरेमागे एक आख्यायिका सांगितली जाते.त्यानुसार,भगवान श्रीकृष्णांनी कलियुगात आपल्या सान्निध्यात राहण्यासाठी गोपिकांना झुरळांच्या रूपात पृथ्वीवर वास करण्याचा वर दिला.त्यामुळे या मंदिरातील झुरळांना ‘गोपिकांचे स्वरूप'मानले जाते.तसेच एका भक्ताला स्वप्नात मिळालेल्या दृष्टांतानंतर येथे शालिग्राम पाषाणातील विष्णूची मूर्ती सापडल्याचीही कथा प्रचलित आहे.

Advertisement

नक्की वाचा >>Raigad News : शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी किल्ले रायगडावर शिवभक्तांचा महासागर उसळला, पाहा ड्रोन VIDEO

भगवान विष्णूंच्या मूर्तीभोवती सतत झुरळांचा वावर

विशेष म्हणजे हे मंदिर जमिनीखालील गाभाऱ्यात आहे. सुमारे दहा पायऱ्या उतरून भाविकांना दर्शनासाठी जावे लागते.भगवान विष्णूंच्या चतुर्भुज मूर्तीभोवती सतत झुरळांचा वावर असूनही मंदिरात कोणतीही दुर्गंधी जाणवत नसल्याचे भाविक सांगतात.वैद्यनाथाचे दर्शन घेतल्यानंतर गोपीनाथाचे दर्शन घेण्याची परंपरा आजही कायम आहे.सोशल मीडियावर झुरळांवर विनोद आणि ट्रोलिंग सुरू असताना परळीतील हे मंदिर श्रद्धेची वेगळी बाजू समोर आणते.मात्र या अनोख्या धार्मिक वारशाला अद्याप मूलभूत सुविधांची प्रतीक्षा आहे.पावसाळ्यात गळती आणि ओलसरपणाच्या समस्यांमुळे भाविकांना त्रास सहन करावा लागतो.त्यामुळे या वैशिष्ट्यपूर्ण मंदिराच्या संवर्धनासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा,अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

"मंदिरात आम्ही देवाचं दर्शन घेतलं आहे.सुरुवातीला गणपती मूर्ती आहे.वर एक विष्णू देवाची मूर्ती आहे.सर्व देवी-देवता डोंगरावर बसतात.पण या मंदिरात एक विशेष खोली आहे.तिथे भरपूर झुरळे आहेत. त्यामुळे या मंदिराला झुरळे गोपीनाथ मंदिर असं नाव दिलं आहे.आजूबाजूची लोक येतात आणि दर्शन घेऊन जातात.विशेष म्हणजे हे गोकुळाष्टमी आणि अधिकमसातच मंदिर उघडं असतं.खूप भाविक येतात आणि दर्शन घेऊन जातात.आज पंचमी आहे. त्यामुळे 33 दिव्यांचं महत्त्व आहे. त्यामुळे आम्ही सर्व भाविक दर्शनाला आलो आहोत", अशी प्रतिक्रिया एका महिला भाविकाने दिली आहे.