ऑस्ट्रेलियाच्या पर्थमध्ये सुरू (Border-Gavaskar Trophy Perth test) असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ( India vs Australia 2024) भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या 9 विकेट पडल्या होत्या. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर 534 धावांचे लक्ष्य ठेवले असून या लक्ष्याचा पाठलाग करणारा ऑस्ट्रेलियाचा संघ चहापानापर्यंत 227 धावाच करू शकला आहे. ऑस्ट्रेलियाच्या 9 विकेट पडल्या असून विजयासाठी भारतीय संघाला अद्याप 1 विकेटची गरज आहे. पहिल्या डावाप्रमाणेच दुसऱ्या डावातही कर्णधार जसप्रीत बुमराहने कमाल दाखवली. पहिल्या डावात 5 विकेट टीपणाऱ्या बुमराहने 3 विकेट घेतल्या असून त्याचा साथीदार मोहम्मद सिराज याने देखील 3 विकेट घेतल्या आहेत. नितीश कुमार रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करणारा ऑस्ट्रेलियाचा संघ सुरुवातीपासूनच दबावाखाली दिसत होता. बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोघांनी केलेला मारा इतका प्रभावी होता की गोलंदाजांचे कर्दनकाळ मानले जाणारे फलंदाजही हतबल झालेले दिसत होते. उस्मान ख्वाजा बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या अवघ्या 17 धावा झाल्या होत्या. 17 धावांमध्ये ऑस्ट्रेलियाने 4 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर ट्रॅव्हीस हेड ने चिवट झुंज देत 101 बॉलमध्ये 89 धावा केल्या. मिचेल मार्शने 47 धावा करत त्याला चांगली साथ दिली होती. त्यानंतर 30 धावा करणाऱ्या अलेक्स कॅरीने देखील भारतीय संघाचं टेन्शन थोडसं वाढवलं होतं. हेडचा अडसर बुमराहने दूर केला, मार्शला नितीश रेड्डीने अर्धशतकापर्यंत पोहोचू दिलं नाही. चहापानानंतर नॅथन लायनला वॉशिंग्टन सुंदरने भोपाळाही फोडू दिला नाही.
नक्की वाचा : एका तासात 110 कोटी खर्च, बॉलर्सचा वरचष्मा मोडत फलंदाजांनी गाजवला दिवस
भारताचा दुसरा डाव 487 धावांवर घोषित
पहिल्या डावात 150 धावा करू शकणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या संघाला पहिल्या डावात 104 धावांवर रोखलं होतं. पहिल्या डावानंतर मिळालेली आघाडी भारतीय संघाने दुसऱ्या डावात वाढवण्यासाठी आक्रमक योजना आखली होती. सलामीवीर यशस्वी जयस्वालने दुसऱ्या डावात 161 धावा केल्या, धावांसाठी झगडणाऱ्या विराट कोहलीनेही शतक झळकावले आणि के.एल.राहुलने 77 धावा केल्या. देवदत्त पद्दीकलच्या 25, वॉशिंग्टन सुंदरच्या 29 आणि नितीश कुमार रेड्डीच्या 38 धावांमुळे भारतीय संघाने 487 धावा गोळा केल्या. यामुळे ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 534 धावांचे अशक्यप्राय आव्हान उभे राहिले होते.
गिलख्रिस्ट ऑस्ट्रेलियाच्या संघावर संतापला
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्ट याने ऑस्ट्रेलिया संघाच्या कामगिरीबद्दल बोलताना टीका केली. भारतीय संघाविरोधात ऑस्ट्रेलियाच्या संघाने नकारात्मक रणनिती आखल्याबद्दल गिलख्रिस्टने टीका केली आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रमुख गोलंदाज भारतीय फलंदाजांपुढे ढेपाळलेले वाटत होते. फलंदाजांना जखडून ठेवत त्यांना लवकर बाद करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंस हा मार्नस लाबुशेनवर अवलंबून राहिला होता असे दिसून आले आहे. गिलख्रिस्टसह इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन या दोघांनीही याबद्दल आश्चर्य व्यक्त करत टीका केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाला आपण यापूर्वी असे कधीही पाहिले नव्हते असे मत या दोघांनी व्यक्त केले आहे. गिलख्रिस्टने ऑस्ट्रेलिया संघाच्या कामगिरीबद्दल बोलताना प्रश्न विचारला की, "ऑस्ट्रेलिया क्रिकेटपटूंना इतक्या निरास मानसिकतेत यापूर्वी कधी पाहिले आहे का?"