Border-Gavaskar Trophy - बुमराहची विजयी सलामी, पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव

पहिल्या डावात 5 बळी टीपणाऱ्या कर्णधार जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात 3 बळी टीपले.

जाहिरात
Read Time: 3 mins
पर्थ:

बुमराहच्या नेतृत्वात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या कसोटी विजय मिळवला आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला. 534 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करणारा ऑस्ट्रेलियाचा संघ 238 धावांमध्ये गारद झाला. पहिल्या डावात 5 बळी टीपणाऱ्या कर्णधार जसप्रीत बुमराहने दुसऱ्या डावात 3 बळी टीपले. मोहम्मद सिराजने 3 बळी टीपत त्याला उत्तम साथ दिली. वॉशिंग्टन सुंदरने 2 तर हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी 1-1 बळी टीपले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

5 सामन्यांच्या मालिकेमध्ये भारतीय संघाने पहिला कसोटी सामना जिंकत मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशीच निकाल लागला असून जसप्रीत बुमराह, यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली हे तिघे या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. दोन्ही डावांत मिळून बुमराहने 8 बळी टीपले. जयस्वालने दुसऱ्या डावात दीडशतकी खेळी साकारली तर विराट कोहलीने दुसऱ्या डावात शतकी खेळी केली होती. 

Advertisement

डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करणारा ऑस्ट्रेलियाचा संघ सुरुवातीपासूनच दबावाखाली दिसत होता. बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोघांनी केलेला मारा इतका प्रभावी होता की गोलंदाजांचे कर्दनकाळ मानले जाणारे फलंदाजही हतबल झालेले दिसत होते. उस्मान ख्वाजा बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या अवघ्या 17 धावा झाल्या होत्या. 17 धावांमध्ये ऑस्ट्रेलियाने 4 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर ट्रॅव्हीस हेड ने चिवट झुंज देत 101 बॉलमध्ये 89 धावा केल्या. मिचेल मार्शने 47 धावा करत त्याला चांगली साथ दिली होती. त्यानंतर 30 धावा करणाऱ्या अलेक्स कॅरीने देखील भारतीय संघाचं टेन्शन थोडसं वाढवलं होतं. हेडचा अडसर बुमराहने दूर केला, मार्शला नितीश रेड्डीने अर्धशतकापर्यंत पोहोचू दिलं नाही. चहापानानंतर नॅथन लायनला  वॉशिंग्टन सुंदरने भोपाळाही फोडू दिला नाही. 

Advertisement

487 धावांवर डाव घोषित

पहिल्या डावात 150 धावा करू शकणाऱ्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या संघाला पहिल्या डावात 104 धावांवर रोखलं होतं. पहिल्या डावानंतर मिळालेली आघाडी भारतीय संघाने दुसऱ्या डावात वाढवण्यासाठी आक्रमक योजना आखली होती. सलामीवीर यशस्वी जयस्वालने दुसऱ्या डावात 161 धावा केल्या, धावांसाठी झगडणाऱ्या विराट कोहलीनेही शतक झळकावले आणि के.एल.राहुलने 77 धावा केल्या. देवदत्त पद्दीकलच्या 25, वॉशिंग्टन सुंदरच्या 29 आणि नितीश कुमार रेड्डीच्या 38 धावांमुळे भारतीय संघाने 487 धावा गोळा केल्या. यामुळे ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 534 धावांचे अशक्यप्राय आव्हान उभे राहिले होते. 

Advertisement

गिलख्रिस्ट ऑस्ट्रेलियाच्या संघावर संतापला

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू अॅडम गिलख्रिस्ट याने ऑस्ट्रेलिया संघाच्या कामगिरीबद्दल बोलताना टीका केली. भारतीय संघाविरोधात ऑस्ट्रेलियाच्या संघाने नकारात्मक रणनिती आखल्याबद्दल गिलख्रिस्टने टीका केली आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रमुख गोलंदाज भारतीय फलंदाजांपुढे ढेपाळलेले वाटत होते. फलंदाजांना जखडून ठेवत त्यांना लवकर बाद करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिंस हा मार्नस लाबुशेनवर अवलंबून राहिला होता असे दिसून आले आहे. गिलख्रिस्टसह इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन या दोघांनीही याबद्दल आश्चर्य व्यक्त करत टीका केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाला आपण यापूर्वी असे कधीही पाहिले नव्हते असे मत या दोघांनी व्यक्त केले आहे. गिलख्रिस्टने ऑस्ट्रेलिया संघाच्या कामगिरीबद्दल बोलताना प्रश्न विचारला की, "ऑस्ट्रेलिया क्रिकेटपटूंना इतक्या निरास मानसिकतेत यापूर्वी कधी पाहिले आहे का?"

Topics mentioned in this article