चॅम्पिअन्स ट्रॉफी यंदा पाकिस्तानात खेळवली जाणार आहे. त्यापूर्वी एक महत्त्वपूर्ण मालिका पाकिस्तानात खेळवली जात आहे. हल्ली तिरंगी मालिका फार कमी पाहायला मिळतात, मात्र पाकिस्तानात सध्या न्यूझीलँड, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान अशी तिरंगी मालिका आयोजित करण्यात आली आहे. यातील बुधवारच्या एक महत्त्वाच्या सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला. कराचीमध्ये खेळवण्यात आलेल्या सामन्यात पाकिस्तानने 6 गडी राखत विजय मिळवला. या सामन्यात मैदानावर शाब्दीक चकमकी झडल्या. ज्यामुळे ICC ने पाकिस्तानी खेळाडूंना दंड ठोठावला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी सह पाकिस्तानच्या 3 खेळाडूंविरोधात कारवाई केली आहे. ICC ने आफ्रिदीवर मॅच फीच्या 25 टक्के दंड लावला आहे. आफ्रिदीवर दक्षिण आफ्रिकेच्या मॅथ्यू ब्रीटजकेवर धाव घेत असताना वाट अडवल्याचा आरोप आहे. आफ्रिदीने धाव घेत असताना रोखण्याचा प्रयत्न केल्याने मॅथ्यू भडकला होता आणि या दोघांमध्ये भर मैदानात बाचाबाची झाली होती.
आफ्रिदीशिवाय ICC ने कामरान गुलाम आणि सौद शकील यांनाही दंड ठोठावला आहे. या दोघांना मॅच फीच्या 10-10% दंड ठोठावण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा बाद झाल्यानंतर या दोघांनी जल्लोष करताना सगळ्या मर्यादा ओलांडल्या होत्या. या दोघांनी बावुमाची विकेट पडल्यानंतर जे अॅग्रेशन दाखवलं ते खटकणारं होतं. या तिघांनीही आपली चूक मान्य केली असून शिक्षा स्वीकार केली आहे.
12 फेब्रुवारी रोजी कराचीमध्ये पाकिस्तान विरूद्ध दक्षिण आफ्रिका सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने 50 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावत 352 रन्स केले होते. पाकिस्तानी संघाने हे आव्हान 49 ओव्हरमध्येच पूर्ण केले. पाकिस्तानी कर्णधार मोहम्मद रिझवानने 122 धावा केल्या तर सलमान आगा याने 134 धावा केल्या. या दोघांच्या शतकी खेळीमुळे पाकिस्तानने आव्हान सहजरित्या पार केले.