- कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारत आणि पाकिस्तान यांच्यात १५ फेब्रुवारी रोजी महत्त्वाचा सामना होणार आहे
- पाकिस्तानचा फिरकीपटू उस्मान तारिकच्या विचित्र गोलंदाजी ॲक्शनमुळे चर्चेत आहे
- रविचंद्रन अश्विन उस्मानला कशा पद्धतीने सामोरे जायचे याचा कानमंत्र दिलाय
Ravichandran Ashwin on How to Face Usman Tariq: कोलंबोत येत्या रविवारी हाय-व्होल्टेज लढत होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतीक्षित सामना 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात पाकिस्तानचा मिस्ट्री फिरकीपटू उस्मान तारिक भारतीय फलंदाजांसाठी आव्हान ठरू शकतो अशी चर्चा आहे. तारिकच्या विचित्र गोलंदाजी ॲक्शनमुळे क्रिकेट विश्वात उलटसुलट चर्चा सुरू आहेत. तो चेंडू थांबून टाकतो की फेकतो याबाबतही क्रिकेट जगात बोललं जात आहे. भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने त्याला सामोरे जाण्यासाठी एक सोपी पण प्रभावी रणनीती सुचवली आहे.
अश्विनने आपल्या 'ॲश की बात' या युट्युब चॅनेलवर बोलताना सांगितले की, "जर गोलंदाज चेंडू टाकण्यापूर्वी थोडा वेळ थांबत असेल म्हणजेच पॉज घेत असेल, तर फलंदाजाला क्रीझवरून बाजूला होण्याचा पूर्ण अधिकार आहे." अश्विनच्या मते, फलंदाजाने अंपायरला सांगावे की गोलंदाज नेमका कधी चेंडू सोडणार हे समजत नसल्याने मी बाजूला झालो. यामुळे गोलंदाजावर मानसिक दबाव निर्माण होईल आणि अंपायरसाठीही ही एक कठीण परिस्थिती असेल. अश्विनचा हा कानमंत्री भारतीय फलंदाजांसाठी मोलाचा ठरणार आहे.
उस्मान तारिकने आतापर्यंत 4 टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 11 बळी घेतले आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट 6 पेक्षा कमी आहे. प्रेमदासाच्या संथ खेळपट्टीवर तो निर्णायक ठरू शकतो. याबाबत अश्विन म्हणाला, "सामन्यात विजय मिळवण्यासाठी नियमांच्या चौकटीत राहून सर्व प्रयत्न केले पाहिजेत. जर मी तिथे असतो, तर मी देखील हेच केले असते." अश्विनने भारतीय फलंदाजांना मजेशीर पण तितकाच गंभीर सल्ला दिला आहे. तो म्हणाला, "जेव्हा उस्मान चेंडू टाकताना मध्येच थांबतो, तेव्हा फलंदाजाने सरळ स्टंप्स सोडून बाजूला उभे राहावे. त्यामागे तर्क काय आहे हे ही सांगायला अश्विन विसरला नाही.
यामुळे गोलंदाजाची लय बिघडेल." अश्विनच्या मते, उस्मान हा पाकिस्तानचा 'ट्रम्प कार्ड' आहे, पण फलंदाजांनी अशा प्रकारे प्रतिक्रिया दिली तर त्याच्यावर प्रचंड दडपण येईल. इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसनने तारिकच्या ॲक्शनला अवैध म्हटले होते. मात्र, पाकिस्तान या गोलंदाजाचा वापर अतिशय हुशारीने करत आहे. आता रविवारी होणाऱ्या महामुकाबल्यात भारतीय फलंदाज अश्विनचा हा 'मास्टरप्लॅन' वापरणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.