IND-W vs PAK-W Score Update : भारतीय महिला क्रिकेट संघ आणि पाकिस्तान महिला क्रिकेट यांच्यात आज बर्मिंघममध्ये आयसीसी टी-20 वर्ल्डकप 2026 चा महामुकाबला रंगला. भारताने पाकिस्तानला 171 धावांचं आव्हान दिलं होतं.स्मृती मंधानाच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने 170 धावांपर्यंत मजल मारली.रिचा घोषनेही शेवटच्या टप्प्यात धडाकेबाज फलंदाजी करून 17 चेंडूत 34 धावा कुटल्या. तर कर्णधार हरमनप्रीत कौरनेही 36 धावांची अप्रतिम खेळी केली.
दरम्यान,भारताने दिलेलं लक्ष्य (171) गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या पाकिस्तानच्या महिला फलंदाजांची पुरती दाणादाण उडाली. भारताच्या महिला गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानचा अख्खा संघ गारद झाला. पाकिस्तानचा संघ 17 ओव्हर्समध्ये 110 धावांवर सर्वबाद झाला. त्यामुळे भारताने पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. भारताने पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव करत वर्ल्डकपच्या पहिल्या सामन्यात विजयी झेंडा फडकवला.
श्री चराणीनेही अप्रतिम गोलंदाजी करत 3 विकेट्स घेतल्या
भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार अष्टपैलू खेळाडू दिप्ती शर्माने पाकिस्तानच्या पाच फलंदाजांना बाद केलं. दिप्तीने पंजा घेतल्याने भारताच्या विजयाचा मार्ग सुकर झाला. तर श्री चराणीनेही जबरदस्त गोलंदाजी करून 3 विकेट्स घेतल्या.तर शेफाली वर्माला एका विकेटवर समाधान मानावं लागलं.
पाकिस्तानच्या संघासाठी विकेटकीपर मुनीबा अलीने सर्वाधिक 41 धावा केल्या. गुल फिरोझा आणि आयशा झफरला 12 धावसंख्येवर बाद झाल्या.त्यानंतर पाकिस्तानचे सर्व फलंदाज स्वस्तात माघारी परतले. तर पाकिस्तानसाठी गोलंदाज सादिया इक्बाल आणि फातिमा सनाने प्रत्येकी दोन विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तसच तस्मिया रुबाब आणि रामिन शामिमला फक्त एक विकेट घेण्यात यश मिळालं.