Rajasthan Royals vs Punjab Kings: ऑपरेशन सिंदूरनंतर पुन्हा सुरु झालेल्या आयपीएल स्पर्धेतील 59 वा सामना आज राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. या सामन्यात पंजाब किंग्सने राजस्थानचा 10 धावांनी पराभव केला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्सने राजस्थानला विजयासाठी 220 धावांचे आव्हान दिले होते. मात्र राजस्थानचा डाव 209 धावांवर आटोपला.
जयपूरमधील सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सना 220 धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युत्तरात यशस्वी जैस्वाल आणि वैभव सूर्यवंशी यांनी आपल्या संघाला झंझावाती सुरुवात करून दिली. दोघांनी मिळून पाचव्या ओव्हरमध्येच संघाची धावसंख्या 60 धावांच्या पुढे नेली.वैभव सूर्यवंशी 15 चेंडूत 40 धावा करून बाद झाला. यशस्वी जयस्वालने दुसरी बाजू लावून धरली पण अर्धशतक पूर्ण केल्यानंतर लगेचच तो बाद झाला. जयस्वालने त्याच्या डावात 25 चेंडूत 9 चौकार आणि 1 षटकारासह 50 धावा केल्या.
या सामन्यात संजू सॅमसनने पुनरागमन केले, पण तो फक्त 20 धावा करून बाद झाला. संघाला रियान परागकडून मोठ्या खेळीची आवश्यकता होती, तो 13 धावांवर हरप्रीत बराडने क्लीन बोल्ड झाला. मोठी भागीदारी नसल्यामुळे राजस्थानच्या अडचणी वाढत होत्या. ध्रुव जुरेल आणि शिमरॉन हेटमायर यांच्यात 37 धावांची भागीदारी झाली, तर 11 धावा काढून हेटमायर बाद झाला तेव्हा राजस्थानला विजयासाठी 16 चेंडूत 39 धावा करायच्या होत्या.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राजस्थान रॉयल्सला शेवटच्या षटकात 30 धावा करायच्या होत्या. 19 व्या षटकात अर्शदीप सिंग गोलंदाजी करायला आला, ज्यामध्ये त्याने फक्त 8धावा दिल्या, ज्यामुळे सामना पंजाबच्या बाजूने झाला. मार्को जॅनसेनने शेवटचे षटक टाकले, त्याच्या पहिल्या 4 चेंडूंनंतर सामन्याचा निकाल लागला. पहिल्या दोन चेंडूंवर फक्त दोन धावा आल्या, तर पुढच्या दोन चेंडूंवर त्याने ध्रुव जुरेल आणि वानिंदू हसरंगा यांना बाद केले. शेवटच्या 2 चेंडूंवरील दोन चौकारांचा राजस्थानला कोणताही फायदा झाला नाही.
( नक्की वाचा : इंग्लंड दौऱ्यासाठी India A टीमची घोषणा, यशस्वी जैस्वाल नाही तर 'हा' खेळाडू आहे कॅप्टन ! )