हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात पंजाब किंग्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आक्रमक सुरुवात केली. दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र पंजाबच्या सलामीवीरांनी हा निर्णय काहीसा चुकीचा ठरवत धावांचा पाऊस पाडला. प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंह या जोडीने मैदानावर फटकेबाजी करत संघाला भक्कम स्थितीत नेले. प्रियांश आर्या आणि कॅप्टन श्रेयस अय्यर यांनी अर्धशतक ठोकले. त्यामुळे पंजाबने दिल्ली समोर विजयासाठी 211 धावांचे भलेमोठे लक्ष ठेवले होते. मात्र रोमहर्षक सामन्यात दिल्लीने पंजाबचा सहा चेंडू आणि तीन गडी राखत पराभव केला. 19 व्या ओव्हर्समध्येच दिल्लीने 216 धावा केल्या.
या लक्षाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरूवात चांगली झाली नाही. सलामिवीर लोकेश राहुल आणि अबिशेक पोरेल हे स्वस्त्यात माघारी परतले. राहुलला 9 तर अबिशेकला पाच धावा करता आल्या. साहिर पारख याने चांगली सुरूवात केली पण तो फार काळ टीकू शकला नाही. मात्र त्यानंतर कॅप्टन अक्षर पटेल आणि डेव्हीड मिलर यांनी संघाची बाजू लावून धरली. दोघांनीही आक्रमक अर्धशतक झळकावत दिल्लीला विजयाच्या मार्गावर नेले. त्यानंतर तळाकडच्या फलंदाजांनी छोट्या पण आक्रमक खेळी करत दिल्लीच्या विजयावर शिक्कामोहर्तब केले. या पराभवा मुळे पंजाबच्या प्ले ऑफ मध्ये खेळण्याच्या शक्यतेला धक्का बसू शकतो.
प्रियांश आर्याची फटकेबाजी
सलामीला आलेल्या प्रियांश आर्याने दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेत शानदार अर्धशतक ठोकले. त्याने 33 चेंडूत 56 धावा केल्या. त्यात सहा सिक्सचा समावेश होता. दुसऱ्या बाजूला प्रभसिमरन सिंह 18 धावा काढून बाद झाला असला, तरी त्याने प्रियांशला चांगली साथ दिली. त्यानंतर आलेल्या कॅप्टन श्रेयस अय्यर याने ही धडाकेबाज खेळी करत 36 चेंडूत 59 धावा केल्या. या दमदार खेळीच्या आधारावर पंजाबने 210 धावांचा डोंगर दिल्ली समोर उभा केला.
दिल्ली कॅपिटल्सचे पाच बदल
नाणेफेक जिंकल्यानंतर दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल म्हणाला, "आम्ही प्रथम गोलंदाजी करू. खेळपट्टी फ्रेश असल्याने नवीन चेंडूचा फायदा घेण्याचा आमचा प्रयत्न असेल." दिल्लीने या महत्त्वाच्या सामन्यासाठी संघात 5 बदल केले आहेत. अभिषेक पोरेल, साहिल परख, डेव्हिड मिलर, माधव तिवारी आणि आकिब नबी यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे. पंजाबने लॉकी फर्ग्युसनच्या जागी बेन ड्वारशियसला संघात स्थान दिले होते. पंजाबने 10 पैकी 6 सामने जिंकले आहेत, मात्र गेल्या 3 सामन्यांत त्यांना पराभव स्विकारावा लागला होता.