Success Story: भारताची पहिली ट्रान्सजेंडर अंपायर! कोण आहे रितिका श्री? काय आहे त्यांचं स्वप्न?

कौटुंबिक बहिष्कार आणि सामाजिक अवहेलना सहन करूनही त्यांनी खेळाप्रती असलेली आपली निष्ठा ढळू दिली नाही.

जाहिरात
Read Time: 2 mins

Rithika Sri has made history: आयुष्यात पावलोपावली मिळणारे टोमणे, समाजाची तिरस्कारयुक्त नजर आणि कुटुंबाचा विरोध, अशा अनेक संकटांवर मात करत तामिळनाडूच्या Rithika Sri (रितिका श्री) यांनी इतिहास रचला आहे. रितिका या भारताच्या पहिल्या ट्रान्सजेंडर क्रिकेट अंपायर ठरल्या आहेत. आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून क्रिकेटच्या मैदानावर आपली ओळख निर्माण करणाऱ्या रितिका यांचे आता IPL आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायरिंग करण्याचे ध्येय आहे. भारतासारख्या क्रिकेटवेड्या देशात ट्रान्सजेंडर समुदायाला आजही मुख्य प्रवाहात येण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. अशा स्थितीत रितिका श्री यांनी हा अडसर पार करत अंपायरिंगमध्ये पाऊल ठेवले आहे. 

संघर्षातून साध्य केला टप्पा
सेलम जिल्ह्यातील सिद्दरकोविल येथे राहणाऱ्या 31 वर्षीय रितिका यांचे पूर्वीचे नाव आर. मुथुराज होते. त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केला आहे. त्या मोहालीतील एका आयटी कंपनीत कार्यरत होत्या. मात्र, 2018 मध्ये MS Dhoni आणि रोहित शर्मा यांच्यातील एक सामना पाहिल्यानंतर त्यांच्यातील क्रिकेटबद्दलची ओढ जागृत झाली. त्यांनी अंपायरिंग क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत त्यांनी 300 हून अधिक स्थानिक सामन्यांमध्ये अंपायरिंगचा अनुभव घेतला आहे.

Advertisement

नक्की वाचा - Missing Link: मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक' चं वर्ल्ड रेकॉर्ड! जगातला सर्वात रुंद बोगद्याची 'गिनीज बुक' मध्ये नोंद

भेदभावाचा सामना आणि जिद्द
लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेनंतर रितिका यांचा प्रवास सोपा नव्हता. शस्त्रक्रियेनंतर त्यांना जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडून ड्युटी मिळणे बंद झाले होते. अगदी मैदानावरील सुरक्षारक्षकांनीही त्यांना प्रवेश नाकारला होता. मात्र, कोइम्बतूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना पाठबळ दिले. रितिका सांगतात की, त्यांच्या या प्रवासात त्यांच्या बहिणीने, चिन्नापूर्णाने त्यांना खंबीर साथ दिली.

नक्की वाचा - Shocking news: नवऱ्याची अदला-बदल! 2 सख्ख्या बहिणींनी असा निर्णय का घेतला? सत्य समोर येताच जज ही चक्रावले

धोनीला भेटण्याची इच्छा
रितिका यांचे सर्वात मोठे स्वप्न महेंद्रसिंग धोनीला भेटणे हे आहे. त्या धोनीच्या खूप मोठ्या फॅन आहेत. आगामी जून 2026 मध्ये तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या अंपायरिंग बोर्ड परीक्षेसाठी त्या तयारी करत आहेत. "विराट कोहली, रोहित शर्मा आणि धोनी खेळत असलेल्या सामन्यात अंपायर म्हणून उभे राहणे हे माझे स्वप्न आहे," असे त्यांनी आवर्जून सांगितले. कौटुंबिक बहिष्कार आणि सामाजिक अवहेलना सहन करूनही त्यांनी खेळाप्रती असलेली आपली निष्ठा ढळू दिली नाही.

Topics mentioned in this article