सुजाता द्विवेदी
मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील अंतर आता केवळ कमीच होणार नाही, तर हा प्रवास भारतीय इंजिनीअरिंगच्या ताकदीचा जागतिक पुरावा ठरणार आहे. खंडाळा घाटातील कठीण डोंगराळ भागात साकारलेला 'मिसिंग लिंक' प्रकल्प आता जगाच्या नकाशावर चमकणार आहे. या प्रकल्पातील 23.75 मीटर रुंदीचे जुळे बोगदे जगातील सर्वात रुंद बोगदे ठरले आहेत. याची अधिकृत नोंद 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स'मध्ये होणार आहे.
जगातील सर्वात रुंद बोगदा आणि 10 लेनची वाहतूक
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बोगद्याची रुंदी विक्रमी असून त्यातून 10 लेनची वाहतूक एकाच वेळी होऊ शकणार आहे. या ऐतिहासिक कामगिरीची पाहणी करण्यासाठी गिनीज बुकचे अधिकारी लवकरच भेट देणार आहेत. तसेच, जमिनीपासून 132 मीटर उंचीवर असलेला केबल-स्टेड ब्रीज या प्रकल्पाचे मुख्य आकर्षण आहे.
प्रवासाचा वेळ 25 मिनिटांनी वाचणार
सध्या प्रवाशांना खंडाळा घाटातील वळणावळणाच्या आणि धोकादायक रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात दरडी कोसळणे आणि धुक्यामुळे होणारी वाहतूक कोंडी या प्रकल्पा मुळे कायमची दूर होईल. 'मिसिंग लिंक'मुळे मुंबई-पुणे प्रवासातील 10 धोकादायक वळणे बायपास होणार असून प्रवाशांचा किमान 25 मिनिटांचा वेळ वाचणार आहे. 100 किमी प्रति तास या वेगाने गाड्या या मार्गावरून धावू शकतील.
1 मे पासून वाहतूक सुरू, अवजड वाहनांना तूर्तास प्रवेश नाही
या मार्गाचे उद्घाटन 1 मे रोजी होत असून, पहिल्या टप्प्यात (31 ऑक्टोबर 2026 पर्यंत) केवळ कार आणि बस यांसारख्या हलक्या वाहनांनाच प्रवेश दिला जाईल. सुरक्षेच्या कारणास्तव अवजड ट्रकला सध्या बंदी असेल. विशेष म्हणजे, या हाय-टेक मार्गासाठी प्रवाशांना कोणताही अतिरिक्त टोल द्यावा लागणार नाही. जुन्या टोल दरातच जागतिक दर्जाच्या प्रवासाचा आनंद घेता येईल.
सह्याद्रीच्या कुशीत 'मिसिंग लिंक'च्या रूपाने भारतीय अभियांत्रिकीचा एक अनोखा आविष्कार साकारला आहे. खंडाळा घाटातील घाटमाथा आणि लोणावळा येथील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल. 23.75 मीटर रुंदीच्या बोगद्याने जागतिक विक्रम प्रस्थापित केला असून, यामुळे 10 पदरी वाहतूक सुरळीत होणार आहे. कठीण भौगोलिक परिस्थिती आणि पावसाळ्यातील आव्हानांवर मात करून उभारलेला केबल-स्टेड पूल हे आधुनिक स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण आहे. प्रवाशांसाठी सुरक्षितता आणि वेग यांचा मेळ घालत हा मार्ग 'झिरो-ग्रेडियंट' तंत्रज्ञानावर आधारित आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world