India Vs New Zealand T20 Match: न्यूझीलँडविरूद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने तुफानी बॅटींग केली. गेल्या काही दिवसांपासून सूर्यकुमार हा फॉर्ममध्ये नव्हता. शुक्रवारच्या सामन्यात सूर्यकुमारने अवघ्या 37 चेंडूत 82 धावा चोपून काढल्या. यामध्ये 9 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. या खेळीमुळे सूर्यकुमारला पुन्हा फॉर्म गवसल्याचे दिसून आले आहे. त्यात तो सातत्य राखू शकतो का हे येणाऱ्या काही सामन्यांमध्ये स्पष्ट होईल. T20 वर्ल्ड कपला सुरूवात होण्यापूर्वी सूर्यकुमारला जर पुन्हा लय सापडली तर तो भारतीय क्रिकेट संघासाठी सगळ्यात मोठा दिलासा असेल. शुक्रवारच्या सामन्यात सूर्यकुमार यादव भारतीय संघ विजयी होताच डगआऊटकडे धाव घेतली. तो घाईघाईत कुठे चाललाय, असा अनेकांना प्रश्न पडला होता. मात्र यानंतर ज्या घटना घडल्या त्या कॅमेऱ्यात कैद झाल्या असून या व्हिडीओंमुळे सगळा उलगडा झाला.
नक्की वाचा: T20 World Cup 2026: पाकिस्तान पण टी20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडणार?
सूर्यकुमार यादवने नेमके काय केले ?
न्यूझीलँड विरुद्धच्या दुसऱ्या टी-20 (T20I) सामन्यात भारताने शानदार विजय मिळवला. या विजयानंतर सूर्यकुमार थेट टीम इंडियाच्या डगआउटमध्ये गेला. तिथे त्याने टीम इंडियाचा कोच गौतम गंभीर किंवा संघातील इतर वरिष्ठ सहकाऱ्यांना न गाठता थेट 'पडद्यामागच्या हिरो'ला गाठले आणि त्याच्या पाया पडला. बराच काळ खराब फॉर्ममध्ये असलेल्या सूर्याने या खेळीने कमबॅक केल्याचे सांगितले जात आहे. सामना संपल्यानंतर जेव्हा सर्व खेळाडू जल्लोष करत होते, तेव्हा सूर्याने टीम इंडियाचा थ्रोडाउन स्पेशलिस्ट 'रघु'च्या दिशेने धाव घेतली आणि त्याचे पाय धरले. (Why did Suryakumar Yadav touch Raghu's feet?)
सूर्यासाठी 'रघु'ने घेतली होती मेहनत
सूर्यकुमार यादव बऱ्याच दिवसांपासून मोठी खेळी साकारण्यासाठी झगडत होता. मागील अनेक डावांत त्याला साधे अर्धशतकही करता आले नव्हते. पुन्हा फॉर्ममध्ये परतण्यासाठी झगडत असलेल्या सूर्याने रघुची मदत घेतली होती. नेट प्रॅक्टिसमध्ये रघुने, सूर्यकुमार यादव याला खूप मदत केली. यामुळे 82 धावांची झंझावाती खेळी साकारल्यानंतर सूर्यकुमारने रघुचे आवर्जून आभार मानले.
कोण आहे 'रघु'?
रघु याचे पूर्ण नाव राघवेंद्र द्विवेदी आहे. तो गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियासोबत थ्रोडाउन स्पेशलिस्ट म्हणून काम पाहातो आहे. सचिन तेंडुलकर, एम.एस. धोनी आणि विराट कोहली यासारख्या दिग्गजांना त्याने नेटमध्ये सराव करवला आहे. 'साइडआर्म'द्वारे तो ताशी 140-150 किमी वेगाने बॉल फेकतो. वेगवान गोलंदाजांचा मुकाबला करण्यासाठी भारतीय संघातील फलंदाजांना तो मदत करत असतो. रघु क्रिकेटर होण्याचे स्वप्न पाहात मुंबईला आला होता, मात्र त्याला क्रिकेटपटू म्हणून फारसे यश मिळाले नव्हते. नेटमध्ये फलंदाजांना सराव करण्यासाठी त्याने मदत केली आणि थ्रोडाऊन स्पेशालिस्ट म्हणून त्याने आपले नाव कमावले. आज रघु हा भारतीय क्रिकेट संघाचा अविभाज्य घटक बनला आहे.