जागतिक क्रिकेटमध्ये सध्या एका मोठ्या वादाने डोके वर काढले आहे. 2026 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) सुरक्षा कारणास्तव भारतात येण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. बांगलादेशने भारतातील त्यांचे सगळे सामने श्रीलंकेत हलविण्याची मागणी केली होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बांगलादेशची ही मागणी फेटाळून लावल्यानंतरही बांगलादेश आपल्या भूमिकेवर ठाम आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचा माजी कर्णधार रशीद लतीफ याने एक खळबळजनक विधान केले असून, पाकिस्तानने बांगलादेशला पाठिंबा देत विश्वचषकावर बहिष्कार टाकावा, अशी मागणी केली आहे.
नक्की वाचा: हिंदू अभिनेत्रीला भररस्त्यात विवस्त्र करण्याचा प्रयत्न, रेप आणि ठार मारण्याची धमकी
बांगलादेशचा भारतात सामने खेळण्यास नकार
2026 चा टी-20 विश्वचषक भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला जाणार आहे. नियमानुसार, स्पर्धेतील काही सामने भारतात तर काही श्रीलंकेत होणार आहेत. मात्र, बांगलादेशने सुरक्षेच्या कारणास्तव आपले सर्व सामने भारतातून श्रीलंकेत हलवण्याची विनंती आयसीसीकडे केली होती. आयसीसीने ही विनंती अमान्य करत भारतात कडेकोट सुरक्षा व्यवस्था असल्याचे सांगितले आहे. तरीही, बांगलादेशने आपला निर्णय बदललेला नाही. त्यांनी भारतात सामने खेळण्यास नकार दिला आहे.
'रशीद लतीफ'चा बहिष्काराचा सल्ला
या संपूर्ण प्रकरणावर पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक-फलंदाज रशीद लतीफ याने आपले मत मांडले आहे. एका युट्युब चॅनेलवर बोलताना लतीफ म्हणाला की, "जर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला नाही, तर या स्पर्धेतील रंगत अर्ध्याहून कमी होईल. सध्याच्या जागतिक क्रिकेट यंत्रणेला (Cricket System) आव्हान देण्याची हीच उत्तम वेळ आहे. पाकिस्तानने बांगलादेशच्या पाठीशी उभे राहात त्यांनीही टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळण्यास नकार दिला पाहिजे."
नक्की वाचा: जिम की धर्मांतराचा सापळा? व्यायामाच्या नावाखाली तुमच्या लेकीच्या मनावर आणि धर्मावर घातला जातोय घाला
लतीफने पुढे म्हटले की, "असा निर्णय घेण्यासाठी मोठ्या धाडसाची गरज असते. जर पाकिस्तानने या वेळी भूमिका घेतली नाही, तर भविष्यात त्यांना पुन्हा अशी संधी मिळणार नाही. पाकिस्तान हे जागतिक क्रिकेटमधील मुख्य केंद्र आहे आणि जर पाकिस्तानने आयसीसी स्पर्धांमधून माघार घेतली, तर विश्वचषकाचा बेरंग होऊ शकतो."
बांगलादेशचे रडगाणे, पाकिस्तानने आळवला सूर
गेल्या वर्षी भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता, हाच संदर्भ देत लतीफने म्हटले कीत्यावेळी भारताचे सामने दुबईला हलवण्यात आले होते. त्यानंतर आयसीसीने असा तोडगा काढला होता की, 2028 पर्यंत भारत आणि पाकिस्तान आपले सामने एकमेकांच्या देशात न खेळता तटस्थ ठिकाणी (Neutral Venues) खेळतील. लतीफच्या मते, जर भारताला सुरक्षेच्या नावाखाली सामने बदलण्याची मुभा मिळते, तर बांगलादेशला ती का मिळू नये?
पाकिस्तानने बहिष्कार टाकल्यास मोजावी लागेल मोठी किंमत
रशीद लतीफने मान्य केले की, जर पाकिस्तानने विश्वचषकावर बहिष्कार टाकला, तर त्यांच्यावर आयसीसीकडून बंदी घातली जाऊ शकते. पाकिस्तानला आर्थिक नुकसानही सहन करावे लागेल. मात्र, तरीही त्याने पाकिस्तानने धाडसी निर्णय घ्यावा असा सल्ला दिला आहे. पाकिस्तानच्या हाती 'ट्रम्प कार्ड' असून बांगलादेशने घेतलेली भूमिका योग्य असल्याचे लतीफचे म्हणणे आहे.