T-20 World Cup : फिरकीच्या जाळ्यात अडकला 'साहेबांचा संघ', हिटमॅनची टीम इंडिया अंतिम फेरीत

विजयासाठी १७२ धावांचं आव्हान मिळालेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय फिरकीपटूंसमोर अक्षरशः गुडघे टेकले. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी इंग्लंडच्या फलंदाजीचं कंबरडचं मोडून ठेवलं.

जाहिरात
Read Time: 3 mins
अक्षर पटेलने (Axar patel) ने इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडलं (फोटो सौजन्य - BCCI)
मुंबई:

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने वेस्ट इंडिज येथे सुरु असलेल्या टी-२० विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघाने इंग्लंडचा ६८ धावांनी धुव्वा उडवला. विजयासाठी १७२ धावांचं आव्हान मिळालेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी भारतीय फिरकीपटूंसमोर अक्षरशः गुडघे टेकले. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनी इंग्लंडच्या फलंदाजीचं कंबरडचं मोडून ठेवलं.

नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने - 

पावसाचं सावट असल्यामुळे हा सामना सुरु होण्यासाठी विलंब झाला. नाणेफेकीचा कौल इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरच्या बाजूने लागला. ज्यानंतर त्याने लगेचच बॉलिंगचा निर्णय घेतला. ज्याबद्दल अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. पावसाचं सावट असल्यामुळे हा सामना रद्द झाला असता तर भारताला अंतिम फेरीत प्रवेश मिळणार होता. ज्यामुळे इंग्लंडसाठी या सामन्यात चांगली कामगिरी करणं गरजेचं होतं.

ज्यानुसार इंग्लंडने डावाची चांगली सुरुवात केली देखील. रिस टोपलेने विराट कोहलीला अवघ्या ९ धावांवर माघारी धाडलं. संपूर्ण स्पर्धेत सुरु असलेला विराटचा बॅडपॅच या सामन्यातही कायम राहिला. यानंतर मैदानात आलेल्या ऋषभ पंतने रोहितला चांगली साथ दिली. रोहितने आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत काही सुरेख फटके खेळत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. यामध्ये रोहितला यशही येत होतं. परंतु तेवढ्यातच सॅम करनने पंतचा अडसर दूर केला. पंत अवघ्या ४ धावांवर बाद झाला.

यानंतर सूर्यकुमारच्या साथीने रोहितने पुन्हा भारतीय डावाला आकार देण्यास सुरुवात केल्यानंतर सामन्यात वरुणराजाने हजेरी लावली, ज्यामुळे सामना थांबवण्यात आला.

पावसाचा खेळ थांबला, रोहित पुन्हा चमकला -

पावसाचा खेळ थांबल्यानंतर रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव ही जोडी पुन्हा मैदानात आली. यावेळी दोघांनीही आपल्या नेहमीच्या शैलीत चौफेर फटकेबाजी करत धावा जमवण्यास सुरुवात केली. रोहितने यादरम्यान आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. तिसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी झाल्यानंतर अखेरीस आदिल रशिदने रोहितला बाद केलं. रोहितने ३९ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकार लगावत ५७ धावा केल्या.

Advertisement

भारतीय डावाला घसरण...तरीही आश्वासक स्कोअर करण्यात यश -

यानंतर भारतीय डावाला काहीशी घसरण लागलेली पहायला मिळाली. सूर्यकुमार यादवही फटकेबाजीच्या नादात ४७ धावांवर बाद झाला. यानंतर हार्दिक, रविंद्र आणि अक्षर पटेल यांनी अखेरच्या फळीत दिलेल्या योगदानांमुळे भारताने निर्धारित षटकांत ७ विकेट गमावत १७१ धावांपर्यंत मजल मारली. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने ३ विकेट घेतल्या. त्याला टोपले, आर्चर, करन, आदिल रशिद यांनी प्रत्येकी १-१ विकेट घेत चांगली साथ दिली.

इंग्लंडची आक्रमक सुरुवात परंतु नंतर घसरण -

इंग्लंडने आपल्या डावाची बहारदार सुरुवात केली. आक्रमक सलामीवीर जोस बटलरने भारतीय जलदगती गोलंदाजांना लक्ष्य करत काही सुरेख फटके खेळत भारतावर दबाव वाढवला. अखेरीस रोहित शर्माने फास्ट बॉलर्सना विश्रांती देत स्पिनर्सना संधी दिली.

Advertisement

आपल्या कर्णधाराने टाकलेला हा विश्वास भारतीय स्पिनर्सनी सार्थ ठरवला. अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्विप खेळण्याच्या प्रयत्नात बटलर पंतकडे कॅच देऊन माघारी परतला आणि इंग्लंडच्या डावाला गळतीच लागली. यानंतर मधल्या फळीत हॅरी ब्रूक आणि अखेरच्या फळीतील जोफ्रा आर्चरचा अपवाद सोडला तर एकही इंग्लंडचा फलंदाज भारतासमोर तग धरु शकला नाही आणि टीम इंडियाने अंतिम फेरीत धडक मारली. इंग्लंडचा संघ निर्धारित षटकांत १०३ धावांपर्यंत मजल मारु शकला. भारताकडून कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी ३-३ तर जसप्रीत बुमराहने २ विकेट घेतल्या.