आयसीसी ट्रॉफीचा १३ वर्षांपासून सुरु असलेला दुष्काळ अखेरीस १४ व्या वर्षी संपुष्टात आला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी बाजी मारत टी-२० वर्ल्डकप जिंकला आहे. बार्बाडोसच्या मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात अटीतटीच्या लढतीत टीम इंडियाने आफ्रिकेची झुंज मोडून काढली. हार्दिक पांड्याच्या अखेरच्या चेंडूवर आफ्रिकेच्या फलंदाजाने एक धाव काढली आणि भारतीय खेळाडूंनी मैदानात येऊन जल्लोष केला. कर्णधार रोहित शर्माला यावेळी अश्रू अनावर झालेले पहायला मिळाले.
सामन्यात नाणेफेक जिंकून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला. अंतिम सामन्यासाठीही टीम इंडियाने प्लेइंग ११ मध्ये कोणतेही बदल केले नाहीत. परंतु या सामन्यात भारताची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत हे तिन्ही बिनीचे शिलेदार स्वस्तात माघारी परतले. परंतु संपूर्ण स्पर्धेत खराब कामगिरीमुळे टीकेचा धनी झालेल्या विराटने महत्वाच्या सामन्यात आपली चमक दाखवली.
विराट कोहली आणि अक्षर पटेल यांच्या भागीदारीने भारताचा डाव सावरला. दोघांनीही चौथ्या विकेटसाठी ५४ चेंडूत ७२ धावांची भागीदारी केली. अक्षर पटेलने या भागीदारीत आक्रमक पवित्रा आजमावत चौफेर फटकेबाजी केली. ही जोडी मैदानात टिकतेय असं वाटत असतानाच अक्षर पटेल धावबाद झाला. अक्षरने ३१ चेंडूत १ चौकार आणि ४ षटकार लगावत ४७ धावा केल्या.
यानंतर मैदानात आलेल्या शिवम दुबेने विराट कोहलीला उत्तम साथ दिली. दोघांनीही अखेरच्या षटकांत आफ्रिकन गोलंदाजांची धुलाई करत धावा जमवण्यास सुरुवात केली. विराट कोहलीने यादरम्यान आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. शिवम दुबेच्या साथीने विराट कोहलीने पाचव्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी केली. अखेरच्या षटकांत फटकेबाजी करण्याच्या नादात विराट कोहली मार्को यान्सनच्या गोलंदाजीवर बाद झाला. विराटने ५९ बॉलमध्ये ६ चौकार आणि २ षटकार लगावत ७६ धावा केल्या.
विराट बाद झाल्यानंतर शिवम दुबेही फटकेबाजीच्या प्रयत्नात अखेरच्या षटकात बाद झाला. ज्यानंतर टीम इंडियाने निर्धारित षटकांत १७६ धावांपर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज आणि नॉर्किया यांनी प्रत्येकी २-२ तर यान्सन आणि रबाडाने १-१ विकेट घेतली.
177 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या आफ्रिकेच्या संघाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर रेझा हेंड्रीग्जला जसप्रीत बुमराहने तर एडन मार्क्रमला अर्शदीप सिंगने माघारी धाडलं. या दोन धक्क्यांमुळे आफ्रिकेचा संघ बॅकफूटवर गेला होता. परंतु मोक्याच्या क्षणी क्विंटन डी-कॉक आणि ट्रिस्टन स्टब्ज यांनी आफ्रिकेचा डाव सावरला. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली. पाटा खेळपट्टीवर भारताचं ब्रम्हास्त्र फिरकीपटू देखील आपली कमाल दाखवू शकले नाही. सरतेशेवटी याच फिरकीपटूंनी ही जोडी फोडण्यात यश मिळवलं. अक्षर पटेलने धोकादायक ठरु पाहणाऱ्या ट्रिस्टन स्टब्जला क्लिन बोल्ड केलं. परंतु एक बाजू लावून उभ्या असलेल्या क्विंटन डी-कॉकने फटकेबाजी कायम ठेवत आफ्रिकेला शतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला.
अखेरीस अर्शदीप सिंगने डी-कॉकला आपल्या जाळ्यात अडकवलं. त्याने ३९ धावा केल्या. परंतु यानंतरही आफ्रिकेने हार मानली नाही हेन्रिच क्लासेन आणि डेव्हीड मिलर यांनी मधल्या फळीत फटकेबाजी सुरु ठेवली. आयपीएलपासून फॉर्मात असलेल्या क्लासेनने सुरेख फलंदाजी करत भारतीय गोटात चिंतेचं वातावरण तयार केलं. सामन्याचं पारडं आफ्रिकेच्या दिशेने झुकलेलं असताना हार्दिक पांड्याने क्लासेनला माघारी धाडलं, क्लासेनने ५२ धावा केल्या. यानंतरही आफ्रिकेच्या फलंदाजांनी हार न मानता आपला लढा कायम ठेवला. अखेरच्या षटकात हार्दिक पांड्याच्या बॉलिंगवर सूर्यकुमार यादवने सीमारेषेवर डेव्हीड मिलरचा कॅच घेतला आणि भारताचा जीव भांड्यात पडला. यानंतर हार्दिकने उर्वरित पाच चेंडू टिच्चून मारा करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.