World Championship Of Legends 2025: वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स 2025 च्या चौथ्या सामन्यात आज (20 जुलै) भारत आणि पाकिस्तानमध्ये लढत होणार होती. पण हा सामना रद्द करण्यात आला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत- पाक पहिल्यांदाच भिडणार होते. मात्र भारतीय संघातील काही खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्समध्ये भारतीय संघाचा पहिलाच सामना आज पाकिस्तानसोबत होणार होता. मात्र ऑपरेशन सिंदूरनंतर या सामन्याला जोरदार विरोध पाहायला मिळाला. या स्पर्धेत खेळणाऱ्या खेळाडूंनाही मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले गेले. भारतीय प्रेक्षकांचा वाढता विरोध पाहता टीम इंडियातील खेळाडूंनी पाकिस्तानसोबत सामना न खेळण्याची भूमिका घेतली.
WCL 2025: WCL स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर! कधी अन् कसे पाहाल सामने? पाहा संपूर्ण शेड्यूल
माजी अनुभवी ऑफ-स्पिनर हरभजन सिंग तसेच माजी सलामीवीर शिखर धवन, मधल्या फळीचा स्टार फलंदाज सुरेश रैना आणि अष्टपैलू युसूफ पठाण या खेळाडूंनी सामन्यात खेळण्यास नकार दिला. या वाढत्या विरोधानंतर अखेर बोर्डाला नमते घ्यावे लागले अन् दोन्ही देशांमधील खेळला जाणारा सामना रद्द करण्यात आला.
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्सने शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'पाकिस्तान हॉकी संघाच्या भारत दौऱ्यानंतर आणि अलिकडेच झालेल्या भारत-पाकिस्तान व्हॉलीबॉल सामन्यानंतर, आम्ही भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आयोजित करण्याचा विचार केला होता. तथापि, आम्हाला जाणवले की यामुळे अनेक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात. आम्ही भारतीय क्रिकेट दिग्गजांना आणि आमच्या समर्थकांनाही अस्वस्थ परिस्थितीत टाकले आहे. म्हणून, आम्ही हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आशा आहे की तुम्ही आमच्या भावना समजून घ्याल.'
दरम्यान, वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स 2025 ला 18 जुलैपासून सुरू झाली आहे. ही स्पर्धा 18 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान यूकेमध्ये खेळवली जाईल. या स्पर्धेत एकूण 18 सामने खेळले जातील. पाकिस्तानसोबतचा आजचा सामना रद्द झाल्यानंतर आता भारतीय संघ 22 जुलै रोजी दक्षिण आफ्रिकेशी सामना खेळेल. त्याच वेळी भारताचा सामना 26 जुलै रोजी ऑस्ट्रेलियन संघाशी होणार आहे. त्यानंतर, भारत 27 जुलै रोजी इंग्लंडशी सामना खेळेल. 29 जुलै रोजी भारतीय संघ लीगमधील शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजशी सामना खेळेल.