Ind vs Nz, T20 World Cup Final 2026 : आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामना आज 8 मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे. या मोठ्या सामन्यात टीम इंडियाला इतिहास रचण्याची संधी मिळणार आहे. तर न्यूझीलंड पहिल्यांदाच टी20 विश्वचषक जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. या हाय-वोल्टेज फायनलमध्ये पाऊस खोडा घालू शकतो का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
अहमदाबादच्या हवामानाची अपडेट
Accuweather.com च्या रिपोर्टनुसार, फायनलच्या दिवशी अहमदाबादमध्ये पावसाची शक्यता खूपच कमी आहे. आकाश स्वच्छ राहण्याचा अंदाज आहे.त्यामुळे सामना कोणत्याही व्यत्ययाविना पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.पावसाचा धोका जरी नसला, तरी उन्हाच्या झळा खेळाडूंसाठी मोठा आव्हान ठरू शकतं. दिवसा कमाल तापमान जवळपास 40 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचू शकते. तर रात्री तापमान घसरून अंदाजे 23 डिग्री सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होणार असल्यामुळे दिवसाच्या तीव्र उष्णतेचा परिणाम थोडा कमी होऊ शकतो, पण हलकी उष्णता आणि गरम हवा खेळाडूंच्या फिटनेसची परीक्षा घेऊ शकते.
नक्की वाचा >> IND vs NZ Final: भारत वर्ल्डकप जिंकणार का? AI ने मॅचआधीच निकाल सांगितला; 5 प्लॅटफॉर्मची भविष्यवाणी!
फायनलसाठी खास व्यवस्था
हवामान स्वच्छ राहण्याची अपेक्षा जरी असली,तरीही आयसीसीने कोणतीही परिस्थिती उद्भवल्यास त्याचा सामना करण्यासाठी आधीच तयारी करून ठेवली आहे. जर कोणत्याही कारणाने सामन्यात व्यत्यय आला, तर त्यासाठी राखीव दिवस (रिझर्व्ह डे) देखील ठरवण्यात आला आहे. 8 मार्चला सामना पूर्ण न झाल्यास 9 मार्च हा राखीव दिवस म्हणून वापरण्यात येईल. याशिवाय सामना पूर्ण करण्यासाठी 120 मिनिटांचा अतिरिक्त वेळही ठेवण्यात आला आहे. जेणेकरून दोन्ही संघांना किमान 10-10 षटकं खेळण्याची संधी मिळू शकेल.
सर्वात खराब परिस्थितीत, जर रिझर्व्ह डेवरही सामना होऊ शकला नाही आणि सामना ‘नो रिझल्ट' घोषित झाला.तर दोन्ही संघांना संयुक्त विजेते घोषित केले जाईल. म्हणजेच भारत आणि न्यूझीलंड दोघांनाही ट्रॉफी वाटून घ्यावी लागेल. मात्र सध्याच्या हवामान अंदाजानुसार अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता अत्यंत कमी मानली जात आहे. त्यामुळे चाहत्यांना अपेक्षा आहे की अहमदाबादमध्ये एक रोमांचक आणि संस्मरणीय अंतिम सामना पाहायला मिळेल.