Womens World Cup Final 2025 BCCI Price Money: नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील मैदानावर भारतीय क्रिकेट संघाच्या महिला खेळाडूंनी नवा इतिहास रचला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला धुळ चारत वनडे विश्वचषकावर नाव कोरले. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर २९९ धावांचे आव्हान ठेवले होते, प्रत्यूतरात दक्षिण आफ्रिकेची संपूर्ण टीम 246 धावांवरच गारद झाली. या विजयानंतर बीसीसीआयने टीम इंडियासाठी मोठ्या बक्षिसाची घोषणा केली आहे.
बीसीसीआयने केली मोठी घोषणा| BCCI Announcement
भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी विश्वचषक जिंकून देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या अभूतपूर्व कामगिरीबद्दल बीसीसीआयने संपूर्ण टीमला ५१ कोटी रुपयांचे मोठे बक्षीस जाहीर केले आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी ही घोषणा केली, ज्यात खेळाडूंसह कोचिंग स्टाफ, निवड समिती आणि सहयोगी कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
सैकिया यांनी या विजयाचे श्रेय देताना आयसीसीचे चेअरमन जय शाह यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले. शाह यांनी महिला क्रिकेटमधील पुरस्काराच्या रकमेत ३००% ची ऐतिहासिक वाढ केल्यामुळे हा सन्मान करणे शक्य झाले, असे त्यांनी स्पष्ट केले. या वाढीमुळे महिला क्रिकेटला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवा आयाम मिळाला आहे.
यावेळी सैकिया यांनी आशिया चषक मिळाला नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. महिला संघास विश्वचषक ट्रॉफी लगेच मिळाली, पण पुरुष संघाने दुबईत जिंकलेल्या आशिया कपची ट्रॉफी अजूनही बीसीसीआय कार्यालयात पोहोचलेली नाही. जर ३ नोव्हेंबरपर्यंत (आज) ट्रॉफी मिळाली नाही, तर बीसीसीआय या प्रकरणाची तक्रार आयसीसीकडे करणार आहे. यामुळे क्रिकेट प्रशासनातील दिरंगाई आणि दुहेरी मानकांचा मुद्दा समोर आला आहे.
Womens World Cup: पोरींनो जिंकलात! हरमनप्रितची टीम इंडिया ठरली वर्ल्ड चॅम्पियन
सैकिया यांनी महिला संघाच्या विजयाला १९८३ च्या पुरुष संघाच्या विश्वचषक विजयाशी जोडले. त्यांनी म्हटले की, "कपिल देव यांनी जो नवा उत्साह निर्माण केला होता, तोच उत्साह आणि जोश हरमनप्रीत कौर आणि तिच्या टीमने दाखवला आहे. त्यांनी केवळ ट्रॉफी जिंकली नाही, तर महिला क्रिकेटच्या पुढील पिढीसाठी प्रेरणादायी मार्ग तयार केला आहे."
जय शाह यांनी आपल्या संदेशात महिला संघाच्या यशात बीसीसीआयच्या महत्त्वपूर्ण धोरणांचा वाटा असल्याचे सांगितले. त्यांनी वेतन समानता (equal pay), वाढीव गुंतवणूक आणि महिला प्रीमियर लीग (WPL) मुळे खेळाडूंना मिळालेला आत्मविश्वास यावर जोर दिला. हा ५१ कोटींचा पुरस्कार महिला खेळाडूंच्या मेहनतीला सलाम असून, तो देशातील कोट्यवधी मुलींना क्रिकेटचे स्वप्न पाहण्याची प्रेरणा देणारा आहे.