महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये टीम इंडीयाने दक्षिण अफ्रीकेच्या संघाला धुळ चारली आहे. 298 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना साऊथ अफ्रीकेने सावध सुरूवात केली. नऊ ओव्हर्समध्ये 51 धावा असताना अफ्रीकेची पहिली विकेट पडली. त्यानंतर आलेल्या अॅनेक बॉशला भारतीय मुलींनी खातंही उघडू दिलं नाही. ती शुन्यावर बाद झाली. तर सूने लुस आणि मेरॅझेन कॅप यांना शफाली वर्मा हिने स्वस्त्यात माघारी पाठवलं. पण एकीकडे विकेट पडत असताना आफ्रीकेची कॅप्टन लॉरा हिने एकबाजू लावून धरली होती. मात्र शतक पूर्ण झाल्यानंतर ती ही बाद झाली. टीम इंडियाकडून दिप्ती शर्माने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. तर शफाली वर्माने दोन विकेट घेतल्या. रेणूका सिंगने विकेट घेतली नसली तरी टिच्चू बॉलींग करत अफ्रीकेच्या फलंदाजांना बाधून ठेवलं होतं. अखेर दक्षिण अफ्रिकेचा संपूर्ण संघ 246 धावांवर ऑल आऊट झाला. भारताने 52 रन्सने विजय मिळवला. भारतीय महिला संघांनी पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरलं.
फायनलच्या मॅचमध्ये दक्षिण अफ्रिकेने टॉस जिंकला. त्यानंतर पहिले फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला. भारतीय महिला संघाला बॅटींगसाठी निमंत्रित करण्यात आलं. भारतीय महिला संघाची चांगली सुरूवात झाली. स्मृती मंधना आणि शफाली वर्मा यांनी 104 धावांची शतकी सलामी देत भारताला चांगली सुरूवात दिली. स्मृती 45 धावा काढून बाद झाली. मागील मॅचची हिरो ठरलेली जेमीमा रॉड्रीक्सला या सामन्यात फार काही करता आलं नाही. ती 24 धावा करून बाद झाली. तर कॅप्टन हरमनप्रितकडून ही खूप अपेक्षा असताना ती 20 धावांवर बाद झाली.
पण त्यानंतर ही शफाली वर्मा आणि दिप्ती शर्मा यांनी टीम इंडियाची धुरा सांभाळली. त्यांनी धावसंख्या वाढवली. शफाली वर्माला आपलं शतक पूर्ण करता आलं नाही. ती 87 धावांवर बाद झाली. त्यासाठी तीने 78 चेंडू घेतले. यात सात चौकार आणि दोन सिक्सचा समावेश आहे. तर दिप्ती शर्माने शेवटच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी करत आलं अर्धशतक पूर्ण केलं. तीने 58 चेंडूत 58 धावा केल्या. शेवटी तिला अमनजोत कौर आणि रिचा घोष यांची चांगली साथ मिळाली. रिचा घोषने 24 चेंडूत 34 धावांची खेळी केली. या खेळी मुळे टीम इंडीयाला 298 धावांचे लक्ष गाठता आले. दक्षिण अफ्रीकेसमोर विजयासाठी 299 धावांचे लक्ष ठेवण्यात आले. कोणत्याही वर्ल्डकप फायनलचे हे सर्वात मोठे लक्ष होते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world