काय करावं! 'लाडकी बहीण' योजनेसाठी 12 पुरुषांचे अर्ज, वाचा कशी पकडली चोरी

Mukhyamantri Mazi ladki Bahin Yojana योजनेसाठी 12 पुरुषांनी महिलेचं छायाचित्र लावून स्वत:चा अर्ज भरल्याचा धक्कादायक प्रकार आता उघड झाला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेची सध्या राज्यभर चर्चा आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर करण्यात आली. राज्यातील 21 ते 65 वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. लाभार्थी महिलांच्या खात्यात दर महिना दीड हजार रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे या योजनेला सर्वत्र जोरदार प्रतिसाद मिळतोय. त्याचवेळी अर्ज भरण्यातील गैर प्रकार देखील आता उघड होऊ लागले आहेत. या योजनेसाठी 12 पुरुषांनी महिलेचं छायाचित्र लावून स्वत:चा अर्ज भरल्याचा धक्कादायक प्रकार आता उघड झालं आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कशी पकडली चोरी?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यात हा प्रकार घडला आहे. कन्नड तालुक्यातल्या 12 पुरुषांनी महिलेचे छायाचित्र लावून स्वतःचा अर्ज भरल्याची बाब महिला आणि बालकल्याण विभागाच्या निदर्शनास आली आहे. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव वरिष्ठांना सादर करण्यात आल्याची माहिती बालविकास प्रकल्प अधिकारी निलेश राठोड यांनी दिली.

कन्नड तालुक्यात या योजनेंतर्गत आतापर्यंत 92 हजार 98 अर्ज भरण्यात आले असून त्यातील 90 हजार 957 मंजूर करण्यात आले आहेत. तर, तांत्रिक कारणाने 428 अर्ज अपात्र करण्यात आले आहेत. तर 357 रद्द केले आहेत.

( नक्की वाचा : महिलांनो, 'लाडक्या बहिणी'सह 3 सरकारी योजनांचा घ्या फायदा, घरबसल्या करा लाखोंची कमाई )
 

योजनेसाठी दाखल करण्यात आलेले सर्व अर्ज स्वीकृतीसाठी तालुक्याच्या ठिकाणी आले होते. त्यावेळी संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्यांनी 30 ऑगस्ट रोजी अर्जाची पडताळणी केली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला.  

( नक्की वाचा: Ladki Bahin Yojana : 'या' पद्धतीनं DBT स्टेटस चेक करा आणि राहा निश्चिंत! थेट खात्यात जमा होणार पैसे )
 

कन्नड तालुक्यातल्या 12 जणांनी स्वत:च्या नावानं संबंधित पोर्टलवर अर्ज अपलोड केले. आधार कार्डही स्वत:च्याच नावाचे अपलोड केले. तसेच हमीपत्रही स्वतःच्याच नावाने भरून दिले.  पोर्टलवर फोटो मात्र अन्य महिलांचे अपलोड केले. अर्ज पडताळणीमध्ये त्यांची चोरी पकडली गेली. आता या सर्वांवर कारवाई होणार आहे.