Crime News : आपण जे कर्म करतो त्याचं फळ आपल्याला याच जन्मात मिळतं, असं आध्यात्मात सांगितलं जातं. दिल्ली जवळच्या गावात राहणाऱ्या तीन जणांना त्याची प्रचिती आली आहे. या तिघांनी त्यांनी केलेल्या कर्माचं फळ त्यांना काही मिनिटांमध्येच मिळाले आहे. रस्त्यावर एखादा अपघात झाला तर अपघातग्रस्त व्यक्तीला तातडीनं मदत करणे आवश्यक असते. वेळीच मदत केली तर त्याचे जीव वाचू शकतात. माणुसकीची ही प्राथमिक शिकवणच गुरुग्राममधील तीन जण विसरले होते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नेमकं काय घडलं?
11 जानेवारी रोजी महेरुली-गुरुग्राम रस्त्यावर हा प्रकार घडला. त्या दिवशी पहाटे तीनच्या सुमारास विकास हा मोटारबाईकनं जाणाऱ्या व्यक्तीचा अपघात झाला. या अपघातामध्ये विकास मोटारबाईकसह काही मीटर फरफटत गेला. विकासला गंभीर दुखापत झाली होती. तसंच त्याचा रक्तस्त्राव देखील होत होता.
हा अपघात घडला त्यावेळी फत्तेपूर बेरीमध्ये राहणारे उदय कुमार, टिंकू आणि परमबीर हे तीन मित्र घटनास्थळी पोहोचले. त्यांनी विकासला मदत करण्याच्या ऐवजी त्याला तिथंच तडफडत सोडलं. त्याची बाईक घेऊन पसार झाले. वेळीच मदत न मिळाल्यानं विकासचा मृत्यू झाला.
( नक्की वाचा : Walmik Karad Wife : 'मी त्यांची प्रकरणं बाहेर काढणार', वाल्मिक कराडच्या पत्नीचा थेट इशारा )
बाईक घेऊन निघालेले तीन चोर फार पुढं जाऊ शकले नाहीत. त्यांच्या बाईकचाही काही अंतरावर अपघात झाला. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या तीन चोरांपैकी उदय कुमार अजूनही कोमात आहे. तर टिंकू आणि परमबीर देखील जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या तिघांनाही ड्रग्जचं व्यसन होतं, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हा अपघात झाला त्या घटनास्थळाचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी हस्तगत केले असून पुढील चौकशी सुरु आहे.