अमजद खान, प्रतिनिधी
डिव्हिजन मॅनेजर पदावरुन सेवानिवृत्त झालेल्या 72 वर्षांच्या आजोबांना 72 लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार डोंबिवलीत घडला आहे. एका मोठ्या कंपनीतील डाटा काढून या आजोबांचे ७२ लाख रुपये आरोपींनी लांबवले. त्यांनी आणखी 14 लाखांवर डल्ला मारण्याची तयारी सुरु केली होती. पण, आजोबांचा मुलगा बँकेत मॅनेजर असल्यानं हा प्रकार उघडकीस आला.
मधुकर पराते असं या आजोबांचं नाव आहे. ते डोंबिवली पूर्वमधील खोणी पलावा परिसरातील रहिवाशी आहेत. या प्रकरणात 3 आरोपींना मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून 72 लाखापैकी 9 लाख रुपये पोलिसांनी हस्तगत करुन पराते यांना परत दिले आहेत. अन्य आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
डोंबिवली पूर्वमधील मधुकर पराते डिव्हिजन मॅनेजर पदावरुन सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी मॅक्सलाईफ या वित्तीय कंपनीत गुंतवणूक केली होती. त्यांच्या गुंतवणूकीची मॅच्युरिटी समाप्त होणार होती. फेब्रुवारी महिन्यात त्यांना एक फोन आला. 'तुम्ही कंपनीत केलेल्या गुंतवणुकीमध्ये एजंटनं तुम्हाला फसवलंय. तुम्हाला यामध्ये जास्त फायदा झालाय. यामधील फायद्याची रक्कम तुम्हाला मिळालेली नाही,' असं या व्यक्तींनी सांगितलं. परातेंना ते समजल्यावर धक्का बसला.
( नक्की वाचा : लोकल विस्कळीत झाल्याचा जीवघेणा फटका ! कल्याणच्या वास्तूविशारदाचा दुर्दैवी मृत्यू )
पराते यांनी जास्तीची रक्कम कशी परत मिळणार अशी विचारणा केल्यानंतर त्यांना 3 फॉर्म पाठवण्यात आले. तुम्हाला पैसे परत हवे असतील तर काही रक्कम भरावी लागेल, ही बतावणी करुन फेब्रुवारी-मार्च दरम्यान त्यांच्याकडून 72 लाख रुपये घेतले. फोन करणाऱ्या व्यक्तीनं आणखी 14 लाखांची मागणी केली होती. परते यांच्याकडं आणखी पैसे नव्हते. त्यांनी मुलाकडं पैशाची मागणी केली. मुलाला हा सर्व प्रकार कळताच वडिलांची फसवणूक झाल्याचं त्याला लक्षात आलं. त्यांनी या प्रकरणात मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कादबाने आणि पोलिस निरिक्षक राम चोपडे यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला.
डोंबिवली पोलिसांनी या प्रकरणात सर्वेश कुमार आणि महेंद्र कुमार या दोन तरुणांना दिल्लीमधून अटक केलं. तर बँक अकाऊंट वापरणाऱ्या राजू राजपूतला गोव्यातील कॅसिनोमधून अटक करण्यात आली. राजूसोबत आणखी काही जण फसवणुकीचं काम करत आहेत, असं पोलिसांनी सांगितलं. या आरोपींचा तपास सुरु आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून 9 लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केले असून ते पराते यांना परत दिले आहेत. 'त्या' कंपनीतून पराते यांच्या गुंतवणुकीची माहिती कशी लिक झाली? याचा पोलीस तपास करत आहेत.