भरधाव वेगाने सायकल चालवणं तरुणाला महागात पडलं आहे. सायकल चालवताना स्टंट करणाऱ्या एका तरुणाला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना काशीमीरा (Cycle accident) येथे घडली आहे. मीरारोड येथील रहिवासी असलेला 16 वर्षीय नीरज यादव घोडबंदर किल्ल्यावर पर्यटनासाठी गेला होता. मात्र तीव्र उताराचा रस्ता असतानाही नीरज भरधाव वेगाने सायकल चालवत होता. यावेळी त्याचा सायकलवरील ताबा सुटला आणि समोरील इमारतीच्या गेटवर जाऊन धडकला. यावेळी त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघाताचे हृदयद्रावक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. तो व्हिडिओ पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल.
नीरज राजेश कुमार यादव हा 28 तारखेला सकाळी 11 च्या सुमारस सायकलिंग करण्यासाठी घोडबंदर गाव येथे गेला होता. येथे त्याच्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली. अपघातानंतर नीरजला तत्काळ उपचारासाठी भाईंदर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकिय रूग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या प्रकरणी काशीगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या अपघातात नीरजच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
नक्की वाचा - ब्युटीशियनच्या मृतदेहाचे केले 6 भाग, प्लास्टिकच्या पिशवीत भरून केलं दफन; थरकाप उडवणारा प्रकार
सीसीटीव्हीनुसार, नीरज चिंचोळ्या रस्त्यावरुन वेगाने उतारावर सायकल चालवित होता. यावेळी समोरून दोन तरुण येत होते. त्यामुळे वेगाने असलेल्या सायकलवर नियंत्रण न आल्याने तो शेजारील गेटला लागून असलेल्या भिंतीवर आदळला. यात त्याच्या डोक्याला आणि छातीला मार लागल्याचं दिसून येत आहे. भिंतीला आदळताच तो सायकलसह खाली कोसळला. यानंतर लागलीच त्याला तरुणांनी उचलण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूचे लोकही जमा झाले. त्याच्या पाठिला आधार देऊन बसवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो काहीच प्रतिसाद देत नव्हता. यावेळी त्याने हेल्मेटही घातले नव्हते.