Buldhana News : फेसबुकचं ‘जाळं’ अन् भीतीदायक रात्र! शेगावमध्ये तरुणासोबत भयंकर घडलं

पैशांच्या लालसेपोटी शेगावला पोहोचला अन् घडलं भयंकर कांड...

जाहिरात
Read Time: 2 mins

अमोल सराफ, प्रतिनिधी

Buldhana News : 'नोटा दुप्पट करून देतो' असं फेसबुकवर आमिष दाखवत मध्यप्रदेशातील एका २२ वर्षीय तरुणाला शेगावात बोलावून त्याचे अपहरण करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र, शेगाव ग्रामीण पोलीस यांनी तत्परता दाखवत चित्रपटातील थरारक प्रसंगासारखी कारवाई करत तरुणाची सुखरूप सुटका केली आहे. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इंद्रकुमार मुन्नीलाल यादव (वय २२, रा. देऊर, जि. रीवा, मध्यप्रदेश) या तरुणाला फेसबुकवरून आरोपींनी आपल्या जाळ्यात ओढले. 'एक लाख रुपये द्या, पाच लाख रुपये परत मिळवा,' असं आमिष दाखवण्यात आलं होतं. या लालसेपोटी इंद्रकुमार शुक्रवारी संध्याकाळी शेगाव येथे पोहोचला. २७ फेब्रुवारीच्या रात्री सुमारे १०:३० वाजता आरोपी विकास पाटील आणि त्याच्या तीन साथीदारांनी इंद्रकुमारला शेगाव-खामगाव रोडवरील चिंचोली शिवारात नेले. 'पैसे आणले का?' अशी विचारणा करत त्याला बेदम मारहाण करण्यात आली. आरोपींनी जबरदस्तीने त्याच्या मोबाईलमधून त्यांच्या QR कोडवर ४ हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले. इतकच नव्हे, 'तुझ्या वडिलांकडून एक लाख रुपये मागव,' अशी धमकी देत त्याला रात्रभर बंधक बनवून ठेवण्यात आले.

Advertisement

नक्की वाचा - Badlapur News : लेकीच्या कृत्याने आई-वडिलांना रडू कोसळलं; आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी शहराध्यक्षपदाचा राजीनामा

पोलिसांची थरारक कारवाई...

दरम्यान, इंद्रकुमारने संधी साधून रात्री ‘112' या आपत्कालीन क्रमांकावर कॉल करून मदत मागितली. माहिती मिळताच शेगाव ग्रामीण पोलीस यांनी तत्काळ तपास सुरू केला. आरोपींच्या तावडीतून सुटण्यासाठी इंद्रकुमार एका गोदामात लपून बसला होता. पोलिसांनी शोधमोहीम राबवत २८ फेब्रुवारी रोजी सकाळी सुमारे ७ वाजता त्याची सुखरूप सुटका केली. पैसे ट्रान्सफर झालेल्या खात्याच्या आधारे पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.


पुढील तपास....

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे करत आहेत. दरम्यान, ठाणेदार पीतांबर जाधव यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की, सोशल मीडियावरील अशा फसव्या आणि भ्रामक जाहिरातींना बळी पडू नये. “दुप्पट पैसे” किंवा “झटपट नफा” अशा आमिषांना बळी पडू नका. संशयास्पद बाबी आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधा.
 

Topics mentioned in this article