प्रतिनिधी, अमजद खान
डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात चार महिन्यांच्या मुलीच्या अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. घरातील काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनेच या चिमुरडीचं अपहरण केल्याचं पोलिसांना सांगण्यात आलं होतं. चिमुरडीचे कुटुंबीय चिंतेत होते. पोलिसात तक्रार केल्यानंतर तातडीने पोलीस कामाला लागले आणि अखेर त्यांनी चार वर्षांच्या चिमुरडीचा शोध घेतला. याशिवाय अपहरण करणाऱ्या अल्पवयीन मुलीलाही ताब्यात घेतलं. पोलिसांनी तिची चौकशी केली असता धक्कादायक बाबी समोर आल्या. यावेळी पोलिसांनी तिला अपहरण करण्याचं कारण विचारलं. त्यावेळी मुलीने जे काही सांगितलं ते पोलिसांनाही अपेक्षित नव्हतं.
दोन महिन्यांपूर्वी ही अल्पवयीन मुलगी डोंबिवलीत आली होती. धक्कादायक म्हणजे तिने ज्या चिमुरडीचं अपहरण केलं तिचे वडील सतीश रजत यांनी तिला डोंबिवलीत आणलं होतं. गारमेंटमध्ये काम लावून देतो असं सांगत ही अल्पवयीन मुलगी, तिची आई आणि मावशीला बांगलादेशातून डोंबिवलीला आणले होते. सतीशने त्या मुलीला वेश्याव्यवसायात ढकललं होतं. उतरलेल्या वेळेत तो तिच्याकडून घरकाम करवून घेत होता. इतकच नाही तर तो अल्पवयीन मुलीला तिची आई, मावशी यांना भेटू देत नव्हता. अल्पवयीन मुलगी याला वैतागली होती. सूड उगवण्यासाठी तिने सतीशच्या चार वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा कट आखला.
हे ही वाचा- बोकडाचा बळी देण्याचा अघोरी प्रकार, आठवडाभर झाडाला लटकवून ठेवलं; तडफडून मृत्यू
सतिश रजतचं बिंग कसं फुटलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्व येथील पलावा परिसरात राहणारा सतीश रजत याची चार महिन्याची मुलगी अचानक घरामधून गायब झाली होती. यासंदर्भात सतीश रजत याने डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी सुनील कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादभाने यांच्या नेतृत्वात मुलीच्या शोध सुरू झाला. सतीशच्या घरात काम करणारी मोलकरीण हिने चार महिन्याच्या मुलीचं अपहरण केल्याचं समोर आलं होतं. मानपाडा पोलिसांनी सदर मोलकरणीला शोधून काढले. ती अल्पवयीन होती. पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं आणि चार महिन्याच्या मुलीला तिच्या आईकडे सोपवलं. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलीला अपहरणाचं कारण विचारलं. त्यावेळी तिने जे सांगितले ते ऐकून पोलीस देखील हैराण झाले.अल्पवयीन मुलगी बांग्लादेशी आहे. सतीश रजक याने दोन महिन्यापूर्वी ही अल्पवयीन मुलगी, तिची आई आणि मावशीला डोंबिवलीला आणले. कामाला लावून देतो असं सांगून सतिश रजतने तिघींनाही डोंबिवलीला आणलं होतं. तो त्यांना एका गारमेंट कंपनीमध्ये कामाला लावणार होता. मात्र सतीश याने अल्पवयीन मुलीला देह व्यापार करायला भाग पाडले. दोन महिन्यांपासून ही अल्पवयीन मुलगी देह व्यवसायाचं काम करीत होती. एवढेच नाही तर सतीश तिच्याकडून घरकाम देखील करून घेत होता. या मुलीला आई आणि मावशी यांना भेटू देत नव्हता. याचा राग काढण्यासाठी पीडित अल्पवयीन मुलीने सतीशच्या चार महिन्याच्या मुलीचं अपहरण केलं होते. या पीडित अल्पवयीन मुलीला बांगला भाषा सोडून दुसरी भाषा येत नाही. या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी सतीश रजत आणि त्याच्या चुलत भाऊ सचिन रजत यांना दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. महिलेला उल्हासनगर येथील बाल सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राम चोपडे यांनी दिली.