मनोज सातवी, प्रतिनिधी
गणरायाचं आगमन काही तासांवर येऊन ठेपलं आहे. अनेक घरांमध्ये गणपतीच्या (Ganeshotsav 2024) आगमनाची लगबग सुरू आहे. बाप्पा घरी येणार असल्याने सजावट शेवटच्या टप्प्यात आली आहे. घरातील लहानग्यांसाठी नव्या कपड्यांची खरेदी केली जात आहे. गणेशोत्सवासाठी मुलांना कपड्यांची खरेदी करुन घरी परतत असताना एका कुटुंबावर शोककळा पसरली आहे. काही तासांपूर्वी बाप्पाच्या आगमनामुळे आनंदात असलेल्या घरावर दु:खाची छाया पसरली आहे.
गणेशोत्सवानिमित्त मुलांना कपडे खरेदी करून आनंदात आपल्या घरी परतत असताना शिरसाड - वज्रेश्वरी मार्गावरील चांदीप येथे झालेल्या अपघातात एका मुलीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मुलासह वडील गंभीर जखमी झाले आहेत. विरार पूर्वेला असलेल्या मांडवी गावातील धनंजय पाटील आपल्या मानसी (12)आणि ओंकार (10) या दोन्ही मुलांना घेऊन गणेशोत्सवाच्या निमित्ताने गुरुवारी सायंकाळी कपडे खरेदीसाठी स्कुटरवरुन उसगाव येथे गेले होते. कपडे खरेदी करून घरी परत येत असताना त्याच दिशेने पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर टेम्पोने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. या धडकेत स्कुटरवरील तिघेही रस्त्यावर पडले. याचवेळी मानसीच्या डोक्यावरून टेम्पोचा टायर गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत मुलीचे वडील धनंजय पाटील आणि भाऊ ओंकार हे देखील गंभीर जखमी झाले आहेत.
नक्की वाचा - ATM मधून 1000 काढले, निघाले 1600; प्रत्येक व्यवहारावर 600 रुपये अधिक...ग्राहकांची गर्दी
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर, अपघातानंतर टेम्पो चालक फरार होण्याच्या तयारीत असताना मांडवी पोलिसांनी त्याला पकडून ताब्यात घेतलं आहे. ऐन गणेशोत्सवाच्या काळात धनंजय पाटील यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगरामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, शिरसाड - वज्रेश्वरी मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून या खड्ड्यामुळे देखील अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.