प्रसाद शिंदे, अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यात वर्षातील सर्वात मोठी कारवाई करत पोलिसांनी 19 वर्षीय युवकाच्या खून प्रकरणी कुख्यात 'लपका टोळी'च्या 11 गुंडांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाई मुळे गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले आहेत.
(नक्की वाचा- 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 22 फेब्रुवारी 2025 रोजी वैभव नायकोडी या 19 वर्षीय युवकाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह डोंगरात नेऊन भरदिवसा जाळण्यात आला. इतक्यावरच न थांबता पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने जळालेल्या अवशेषांची हाडंही वेगवेगळ्या ठिकाणी फेकून देण्यात आली होती.
घटनेमागे पूर्व वैमनस्य असल्याचे पोलिस तपासात समोर आले होते . दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत टोळीचा प्रमुख अनिकेत विजय समोवंशी (वय 23) याच्यासह 11 आरोपींना अटक करण्यात आली होती. या सर्व 11 आरोपीवर आता मकोका लावण्यात आला आहे.
'लपका टोळी'च्या या गुंडांवर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता मकोका लावण्यात आल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी सांगितलं आहे.
इंंदापूर बस स्थानकात राडा!
दरम्यान, पुण्याच्या इंदापूर बस स्थानकावर दोन गटांत तुफान हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवाशांसमोरच झालेल्या या प्रकारामुळे परिसरात गोंधळ आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं होत. इंदापूर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप हा वाद आटोक्यात आणला. या प्रकरणी इंदापूर पोलिसात आता 11 जणांना विरोधात सामाजिक शांतता बिघडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.